'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 17:29 IST2025-09-14T17:28:29+5:302025-09-14T17:29:01+5:30
Nitin Gadkari News: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत.

'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
Nitin Gadkari News: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. गडकरी चर्चेत येण्याचे कारण म्हणजे इथेनॉल मिश्रित पेट्रोल. या पेट्रोलमुळे वाहनाची कामगिरी खराब झाल्याच्या तक्रारी अनेकजण करत आहेत. अशातच, गडकरींनी कमाई करण्याबाबत एक मोठे विधान केले आहे. त्यांनी म्हटले की, 'माझ्याकडे पैशांची कुठलीही कमतरता नाही. महिन्याला २०० कोटी रुपये कमवण्याची बुद्धी आहे. मी माझ्या मुलांनाही बिझनेसच्या आयडिया देतो.'
नेमकं काय म्हणाले नितीन गडकरी ?
इंडिया टीव्हीच्या वृत्तानुसार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी एका कार्यक्रमोत बोलताना म्हणाले की, 'माझ्याकडे पैशाची कमतरता नाही. माझ्यात महिन्याला २०० कोटी रुपये कमवण्याची बुद्धी आहे. प्रामाणिकपणे पैसे कसा कमवायचा हे मला माहित आहे. मी दलाली किंवा कुणाची फसवणूक करत नाही. मेहनतीने पैसे कमवायचे, हे मी माझ्या मुलांनाही शिकवले. माझ्या मुलाने इराणमधून ८०० कंटेनर सफरचंद आणले आणि तिथे १००० कंटेनर केळी पाठवली,' अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
सेंद्रिय शेती उत्पादनांच्या विक्रीवर भाष्य
नितीन गडकरी पुढे म्हणतात, 'सेंद्रिय शेती उत्पादनांच्या विक्रीसाठी नागपुरात तीन ते चार ठिकाणी दुकाने उपलब्ध करून दिली जात आहेत. मी हे सर्व केवळ माझ्या कमाईसाठी करत नाही. माझा प्रयत्न शेतकऱ्यांना या प्रयोगांचा फायदा मिळावा, असे आहे. माझे भरपूर उत्पन्न आहे. मी माझ्या मुलांना आयडिया देतो. माझ्या मुलाने इराणमधून ८०० कंटेनर सफरचंद आणले आणि तिथे १००० कंटेनर केळी पाठवली. यातून खूप नफा मिळवला. तंत्रज्ञानाचा वापर आणि पर्यायी शेतीमुळे शेतकऱ्यांची स्थिती नक्कीच सुधारेल,' असेही ते म्हणाले.