भारतात गेलो तर रेड कार्पेट अंथरले जाईल; झाकीर नाईक बरळला! म्हणे, मोदींनी केलेल्या कारवाईमुळे...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 12:05 IST2026-03-25T12:04:33+5:302026-03-25T12:05:45+5:30
Zakir Naik Return to India Marathi: झाकीर नाईकचे भारतात परतण्याबाबत मोठे विधान. 'रेड कार्पेट स्वागता'चा दावा आणि सुप्रीम कोर्टाकडे अट. मनी लाँडरिंग आणि द्वेषपूर्ण भाषणांचे आहेत आरोप.

भारतात गेलो तर रेड कार्पेट अंथरले जाईल; झाकीर नाईक बरळला! म्हणे, मोदींनी केलेल्या कारवाईमुळे...
विवादास्पद इस्लामिक धर्मप्रचारक झाकीर नाईक याचा एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पाकिस्तानी युट्युबर नादिर अलीला दिलेल्या या मुलाखतीत नाईकने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत आपल्या 'हिजरत' (देश सोडून जाणे) आणि पुनरागमनाबाबत खळबळजनक विधाने केली आहेत.
नाईकने या मुलाखतीत म्हटले आहे की, "पंतप्रधान मोदींमुळेच आज मला हिंदुस्तानात प्रत्येकजण ओळखतो. पूर्वी केवळ मुस्लिमांनाच माझे विचार माहित होते, पण आता मुस्लिमांपेक्षा बिगर मुस्लिम लोक मला जास्त ओळखतात." इतकेच नव्हे तर, "अल्लाहची हीच प्लॅनिंग आहे, तो इस्लामच्या शत्रूंकडूनही चांगली कामे करून घेतो. मोदींच्या कारवाईमुळेच माझा अधिक प्रचार झाला," असा दावाही त्याने केला आहे.
'भारतात जाणे सोपे, पण परतणे कठीण'
जेव्हा त्याला विचारण्यात आले की, तो पुन्हा भारतात जाणार का? तेव्हा नाईक म्हणाला, "भारतात जाणे खूप सोपे आहे, पण तिथून परत बाहेर येणे खूप कठीण आहे. जर मी गेलो, तर ते माझे रेड कार्पेटवर स्वागत करतील, पण थेट तुरुंगात बसवतील. कारण त्यांच्या यादीत 'नंबर-१'चा दहशतवादी झाकीर नाईकच आहे."
भारतात परतण्यासाठी ठेवली 'ही' अट
झाकीर नाईकने स्पष्ट केले की, तो कायमचा बाहेर राहणार नाही. "मी भारतात जाणार नाही असे नाही. पण जोपर्यंत मोदी सरकार आहे, तोपर्यंत जाणे धोक्याचे आहे. जेव्हा मोदी पंतप्रधान नसतील आणि नवीन सरकार येईल, तेव्हा मी नक्कीच भारतात परत जाईन," असे विधान त्याने केले आहे. बिगर मुस्लिम लोक माझ्या भाषणांमुळे प्रभावित होऊन इस्लाम स्वीकारत होते, हीच सरकारची खरी अडचण होती, असा दावाही त्याने या मुलाखतीत केला. त्याच्यावर असलेले सर्व आरोप त्याने फेटाळून लावले असून, एकही आरोप सिद्ध झाला नसल्याचे त्याने म्हटले आहे.
काय आहेत झाकीर नाईकवरील आरोप?
मनी लाँडरिंग: अंमलबजावणी संचालनालय (ED) त्याच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करत आहे.
द्वेषपूर्ण भाषणे: सामाजिक सलोखा बिघडवणारी विधाने केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
UAPA अंतर्गत कारवाई: भारत सरकारने त्याची संस्था 'इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन' (IRF) वर बंदी घातली आहे.