"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 19:14 IST2025-12-12T19:13:28+5:302025-12-12T19:14:30+5:30
"व्यापारी कुणाला म्हणतात हे तुम्हाला माहीत आहे का? स्वामी रामदेवजवळ एक पैसाही नाही, मला व्यापारी म्हणताना तुम्हाला लाज वाटत नाही का?"

"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
मी राजकारणी नाही, पण या देशात माझी एक शक्ती आहे. मी किमान ५-१० कोटी लोकांची मते एकत्रित करू शकतो. देश हितासाठी. देशातील १०० कोटींहून अधिक लोकांपर्यंत माझी पोहोच आहे. ही माझी सामाजिक शक्ती आहे, असे योग गुरू स्वामी रामदेव यांनी म्हटले आहे. ते 'आज तक'च्या एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी, आपण एक चांगले योग गुरू आहात की व्यापारी? असा प्रश्न विचारला असता, ते भडकले आणि त्यांनी समोर बसलेल्या अँकरलाच फटकारले. मात्र यानंतर, ते पुन्हा शांत झाले आणि हसत हसत बोलू लागले.
...अन् बाबा रामदेव भडकले -
या कार्यक्रमात योगगुरू स्वामी रामदेव यांना, आपण स्वतःला काय चांगले मानता, आपण चांगले 'योगगुरू' आहात की 'व्यापारी'? असा प्रश्न केला असता, यावर रामदेव संताप व्यक्त करत म्हणाले, "व्यापारी कुणाला म्हणतात हे तुम्हाला माहीत आहे का? स्वामी रामदेवजवळ एक पैसाही नाही, मला व्यापारी म्हणताना तुम्हाला लाज वाटत नाही का? जो संन्यासी पहाटे ३ वाजता उठून रात्री १० वाजेपर्यंत भारत मातेची सेवा करतो, त्याला व्यापारी म्हणण्यापूर्वी दहा वेळा विचार करायला हवा. आम्ही व्यापारी नाही, तर या देशासाठी उपचार करतो, उपकार करतो आणि जी काही सेवा करतो, त्यातून आलेला पैसा आम्ही परमार्थामध्ये लावतो. आपल्या नावावर ना एक इंच जमीन आहे, ना एक रुपया बँक बॅलन्स. ३० वर्षांपूर्वी ते जे दोन कपडे घालायचे, तेच आजही घालतात. "हे विरोधकांनी केलेले आरोप आहेत, पण तुम्ही असे बोलणे योग्य नाही."
"५-१० कोटी मते एकत्रित करण्याची ताकद" -
रागा शांत झाल्यानंतर, रामदेव यांना पुन्हा तोच प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, "मी योगी आणि कर्मयोगी आहे. योग आणि कर्मयोग केल्यावर लोक तुम्हाला सत्ता, संपत्ती आणि ताकद देतात." मी राजकारणी नाही, पण या देशात माझी एक शक्ती आहे. मी किमान ५-१० कोटी लोकांची मते एकत्रित करू शकतो. देश हितासाठी. देशातील १०० कोटींहून अधिक लोकांपर्यंत माझी पोहोच आहे. ही माझी सामाजिक शक्ती आहे. हे लोक योगही करतात आणि मी त्यांना सांगतो, त्या प्रमाणे लाइफस्टाइलही फॉलो करतात." एवढेच नाही तर, "ज्या व्यक्तीची पोहोच देशातील ९९ टक्के घरांपर्यंत आहे, ती केवळ व्यापारातून होते का?" असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.