मी पळपुटा नाही तर बंडखोर, लवकरच येणार सर्वांसमोर, अमृतपाल सिंगचा आणखी एक व्हिडीओ समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2023 23:37 IST2023-03-30T23:36:17+5:302023-03-30T23:37:41+5:30
Amritpal Singh : अमृतपाल सिंगने पुन्हा एकदा सरकारला आव्हान दिले आहे. मी कुठल्याही सरकारला घाबरत नाही, ज्याला जे काय करायचे आहे, ते करू द्या असा इशाराच दिला आहे.

मी पळपुटा नाही तर बंडखोर, लवकरच येणार सर्वांसमोर, अमृतपाल सिंगचा आणखी एक व्हिडीओ समोर
खलिस्तानवरून फुटीतरावादी विधानं करून पंजाबमधील वातावरण बिघडवून अमृतपाल सिंग अल्पावधीतच चर्चेत आला होता. दरम्यान, या अमृतपाल सिंगविरोधात पोलिसांसह तपास यंत्रणांनी गेल्या आठवड्यात मोहीम उघडल्यानंतर तो फरार झाला होता. दरम्यान, तपास यंत्रणा त्याच्या मागावर असून तो पोलिसांना सातत्याने हुलकावणी देत आहे. आता या पळपुट्या अमृतपाल सिंगनए दुसरा व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये तो मी पळपुटा नाही तर बंडखोर आहे, मी पळालेलो नाही. मी लवकरच सर्वांसमोर येईन, असे सांगताना दिसत आहे. तसेच या अमृतपाल सिंगने पुन्हा एकदा सरकारला आव्हान दिले आहे. मी कुठल्याही सरकारला घाबरत नाही, ज्याला जे काय करायचे आहे, ते करू द्या असा इशाराच दिला आहे.
अमृतपाल सिंगने धमकी देताना सांगितले की, माझ्यासोबत ज्याला मारहाण करायची आहे ते करू शकतात. मी घाबरत नाही. नव्या व्हिडीओममध्ये तो कुटुंबीयांना दृढ राहण्यास सांगत आहे. तसेच मी ज्या मर्गावरून चाललो आहे तो काटेरी आहे, असेही तो सांगतोय. त्याबरोबरच अमृतपालने अकाल तख्तच्या जथ्थेदारांना सरबत खालसा बोलवण्याचं आवाहन केलं आहे.
त्याने सांगितले की, मी जो व्हिडीओ प्रसिद्ध करत आहे, कदाचित लोकांना वाटेल की मी पोलीस कोठडीतून व्हिडीओ बनवतोय. मात्र अमृतपालने पुन्हा एकदा तरुणांना भडकावण्याचा प्रयत्न केला आहे. धर्म आणि तरुणांसाठी काही करता आलं तर त्याचा मला आनंद होईल, असेही तो सांगत आहे.
दरम्यान, या अमृतपालने आणखी एका व्हिडीओमध्ये सांगितले होते की, जर पंजाब सरकार केवळ त्याला अटक करू इच्छित होते, तर त्यांनी त्याचा घरी यायला पाहिजे होते. त्याने आत्मसमर्पण केलं असतं. मात्र आपल्यावरील पोलीस कारवाई हा शीख समुदायावरील हल्ला आहे, असेही त्याने बजावले आहे.