मी पक्षाचा कार्यकर्ता, नबीन माझे बॉस! मोठा बदल पाहिलेल्या पिढीचे प्रतिनिधी- पंतप्रधान नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 06:33 IST2026-01-21T06:32:54+5:302026-01-21T06:33:37+5:30
भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षांचे पक्षाच्या सर्व स्तरातून कौतुक

मी पक्षाचा कार्यकर्ता, नबीन माझे बॉस! मोठा बदल पाहिलेल्या पिढीचे प्रतिनिधी- पंतप्रधान नरेंद्र मोदी
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: मी भाजपचा एक कार्यकर्ता आहे आणि पक्षाध्यक्ष नितीन नबीन हे माझे बॉस आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी म्हटले. नबीन यांची भाजपच्या पक्षाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्यामुळे त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली.
दिल्लीतील भाजप मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात मोदी म्हणाले की, नबीन यांच्यावरची जबाबदारी ही केवळ पक्षसंघटनेचे व्यवस्थापन करण्यापुरती मर्यादित नसून, एनडीएतील सर्व मित्रपक्षांमध्ये समन्वय साधण्याचीही आहे. ते वयाने जरी तरुण असले, तरी तेच बॉस आहेत आणि सर्वांनी त्यांचे नेतृत्व मान्य केले पाहिजे, असे मोदी म्हणाले.
भारतात झालेले मोठे बदल पाहिलेल्या पिढीचे ते प्रतिनिधी आहेत. त्यांनी बालपणी रेडिओवरून बातम्या ऐकल्या आणि आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रभावीपणे वापर करण्यात पारंगत आहेत, असेही मोदी म्हणाले.
आगामी २५ वर्षे विकसित भारत घडवण्यासाठी अत्यंत निर्णायक असतील. या महत्त्वाच्या टप्प्याच्या सुरुवातीपासून नबीन भाजपची धुरा यशस्वीपणे वाहतील. याचा पक्षाला फायदा होईल, असेही मोदी म्हणाले.
महाराष्ट्रातील विजयाचा उल्लेख
मोदी यांनी, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, बिहारसह काही राज्यांत भाजपने अधिक मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे. पक्षाचा निवडणूक ‘स्ट्राइक रेट’ अभूतपूर्व असल्याचेही नमूद केले. गेल्या अनेक निवडणुकांतील पक्षाची कामगिरी उत्तम झाली आहे, असेही ते म्हणाले.
वडिलांच्या अकाली निधनानंतर लगेच राजकारणात प्रवेश
नितीन नबीन यांचा जन्म रांची येथे २३ मे १९८० रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव नबीन किशोर प्रसाद सिन्हा असे आहे. नबीन किशोर प्रसाद सिन्हा हे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार होते. वडिलांच्या अकाली निधनानंतर नितीन नबीन यांनी त्यांचा वारसा पुढे नेण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश करून कुटुंबाची सार्वजनिक सेवेप्रति असलेली परंपरा पुढे चालू ठेवली. नितीन नबीन यांच्या पत्नीचे नाव दीपमाला असे असून, या दाम्पत्याला एक पुत्र व कन्या आहे.
स्वतःचे घर नाही; एकूण मालमत्ता सुमारे ३.०८ कोटी रुपये
नितीन नबीन यांचा साधेपणा, स्वच्छ प्रतिमा याची आता चर्चा सुरू झाली आहे. ४५ वर्षीय नितीन नबीन यांच्याकडे आलिशान गाड्या असल्या, तरी निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्या नावावर स्वतःचे कोणतेही घर नाही. निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, २०२५ मध्ये नबीन यांची एकूण संपत्ती सुमारे ३.०८ कोटी रुपये आहे. त्यांच्यावर सुमारे ५६.६ लाख रुपयांचे कर्ज आहे. तर पत्नीच्या नावावर १.४७ कोटींची स्थावर मालमत्ता आहे.
नितीन नबीन यांच्याकडे दोन एसयूव्ही गाड्या आहेत. त्यामध्ये महिंद्रा स्कॉर्पिओ (२०२५ मॉडेल) आणि टोयोटा इनोव्हा क्रिस्टा यांचा समावेश आहे. या दोन्ही गाड्यांची बाजारातील एकूण किंमत सुमारे ३७.८ लाख रुपये असल्याचे सांगितले जाते. याशिवाय, या दाम्पत्याकडे सुमारे ११.३ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आहेत. पत्नी दीपमाला यांच्या नावावर झारखंडमधील धुर्की येथे २९ लाख रुपयांचा प्लॉट आहे. नबीन यांची चलसंपत्ती १.६० कोटींची आहे.
२६व्या वर्षी आमदार, ४५व्या वर्षी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष
वयाच्या २६व्या वर्षी आमदार आणि आता ४५ व्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष ही नितीन नबीन यांच्या राजकीय कारकिर्दीची उंच भरारी आहे. त्यांची पक्षाची सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली. भाजपसाठीदेखील हा सकारात्मक बदल आहे. नबीन यांच्या नेतृत्वाखाली भाजप राष्ट्रीय राजकारणावर पकड अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करणार आहे.
आजवर प्रसिद्धीच्या झोतात फारसे नसलेले, बिहारमध्ये पाच वेळा आमदार म्हणून निवडून आलेले नबीन राज्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्याची धुरा वाहिलेले मंत्री अशी त्यांची ओळख आहे. १४ डिसेंबर रोजी ते भाजपचे कार्यकारी अध्यक्ष बनले. मनमिळाऊ स्वभावाचे नितीन नबीन हे आता तामिळनाडू, केरळ आणि आसाममध्ये येत्या एप्रिलमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसह इतर अनेक निवडणुकांत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नेतृत्व करणार आहेत.
बिहारमधून आलेले भाजपचे पहिले राष्ट्रीय अध्यक्ष अशीही त्यांची ओळख आहे. कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी काही राज्यांचा दौरा केला. तिथे त्यांनी केलेली वक्तव्ये अतिशय मार्मिक होती. ते म्हणाले की, राजकारण ही काही १०० मीटर धावण्याची शर्यत नाही, तर एक लांब पल्ल्याची मॅरेथॉन आहे. राजकारण ही वेगाची नव्हे तर संयम आणि सहनशक्तीची परीक्षा असते.
नितीन नबीन यांचा राजकीय प्रवास
- नितीन नबीन यांचा भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चामधून राजकीय प्रवास सुरू झाला.
- २००६ मध्ये त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर पाटणा पश्चिम विधानसभा जागेसाठी भाजपने त्यांना उमेदवारी दिली.
- राजकारणात येण्यासाठी त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले.
- ४५ वर्षांचे नबीन बांकिपूरमधून सलग पाच वेळा आमदार म्हणून विजयी झाले आहेत.
- कायस्थ असलेले नबीन अनुभवसंपन्न आहेत आणि लोकांसाठी तसेच संघटनेसाठी सतत कार्यरत असतात.
- २०२३ च्या छत्तीसगढ विधानसभा निवडणुकीत त्यांच्यातील क्षमतेची केंद्रीय नेतृत्वाला अधिक ओळख झाली. त्या निवडणुकीत काँग्रेसचा भाजपने पराभव केला.
- त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकांत भाजपने छत्तीसगडमधील ११ पैकी १० जागा जिंकल्या. या कामगिरीमुळे भाजपच्या कार्यकारी अध्यक्षपदी त्यांची निवड करावी, असा विचार पक्षश्रेष्ठींकडून झाला.