Hydraulic Crane Accident Gwalior : धक्कादायक! स्वातंत्र्यदिनाच्या आधी मोठी दुर्घटना; झेंडा लावताना अपघात, तिघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2021 13:00 IST2021-08-14T12:57:10+5:302021-08-14T13:00:09+5:30
Hydraulic Crane Accident Gwalior : हायड्रोलिक मशीनवर महापालिकेचे कर्मचारी झेंडा लावण्यासाठी चढत होते. मात्र तीच अचानक तुटली. या घटनेनंतर एकच गोंधळ उडाला.

Hydraulic Crane Accident Gwalior : धक्कादायक! स्वातंत्र्यदिनाच्या आधी मोठी दुर्घटना; झेंडा लावताना अपघात, तिघांचा मृत्यू
नवी दिल्ली - मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. महाराजा बाडा येथील महानगरपालिका कार्यालयात झेंडा लावताना मोठी दुर्घटना झाली आहे. हायड्रोलिक मशीनवर महापालिकेचे कर्मचारी झेंडा लावण्यासाठी चढत होते. मात्र तीच अचानक तुटली. या घटनेनंतर एकच गोंधळ उडाला. जखमींना तातडीने खाली आणण्यात आलं. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकाला गंभीर दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला ही घटना घडल्याने सर्वांनाच धक्का बसला आहेय.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकाऱ्यांसह प्रभारी महानगरपालिका आयुक्त मुकुल गुप्ता हे देखील घटनास्थळी दाखल झाले. या घटनेनंतर संतप्त झालेल्या एका व्यक्तीने प्रभारी पालिका आयुक्तांच्या कानशिलात लगावली. यानंतर घटनास्थळी गोंधळ आणखी वाढला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत लगेच जमावाला दूर केलं आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना बाहेर काढलं. अधिकाऱ्यांनी या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांशी चर्चा केली आहे.
जखमीला योग्य उपचार देण्याचे देखील निर्देश देण्यात आले आहेत. तसेच याची अधिक चौकशी केली जात आहे. शहरात सर्वत्र 15 ऑगस्टची जोरदार तयारी सुरू आहे. याच दरम्यान महाराजा बाडा येथील महानगरपालिका कार्यालयातही ध्वजारोहणाची तयारी केली जात होती. त्यासाठी शनिवारी सकाळी अग्निशमन दलाचे हायड्रोलिक मशीन मागवण्यात आले. इमारतीवर झेंडा लावण्यासाठी काही कामगार या हायड्रोलिक मशीनवर चढले. या दरम्यान अचानक हायड्रॉलिक मशीन तुटले.
अपघातात महामंडळाचे कर्मचारी मंजर आलम, कुलदीप दंडैतिया आणि विनोद यांचा मृत्यू झाला आहे. तर एक कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस दल आणि प्रभारी महापालिका आयुक्त मुकुल गुप्ता घटनास्थळी पोहोचले. जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्याबरोबरच मृतदेह डेडहाऊसमध्ये नेण्याचे काम सुरू करण्यात आले. दरम्यान, काही लोकांनी घटनास्थळी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.