लग्नात बूट चोरल्यानं भडकला नवरा, वरमाला फेकली; नाराज नवरीनेही लग्न मोडले, अनवाणीच परत पाठवला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 16:39 IST2025-11-12T16:39:00+5:302025-11-12T16:39:34+5:30
प्रकरण इतके वाढले की भडकलेल्या नवऱ्याने गळ्यातील वरमाला काढून फेकून दिली. त्याशिवाय अंगठीही काढून टाकली. नवऱ्याच्या या वर्तवणुकीवर नवरीही संतापली.

लग्नात बूट चोरल्यानं भडकला नवरा, वरमाला फेकली; नाराज नवरीनेही लग्न मोडले, अनवाणीच परत पाठवला
मथुरा - उत्तर प्रदेशातील मथुरा येथे लग्नात बूट चोरण्याच्या प्रथेवरून चांगलाच राडा झाला. नवरा या प्रथेमुळे इतका चिडला की त्याने नवरी आणि तिच्या कुटुंबाला खडे बोल सुनावले. नवऱ्याच्या या वर्तवणुकीमुळे नवरीही संतापली, तिने लग्नाला स्पष्टपणे नकार दिला. त्यामुळे नवऱ्याला अनवाणीच माघारी परतावे लागले.
मथुरेच्या सुरीर परिसरातील ही घटना आहे. याठिकाणी ७ नोव्हेंबरला लग्न समारंभात बूट चोरीच्या प्रथेमुळे नवरा भडकला होता. लग्नात जेवणावेळी मुलाने बूट काढले होते. मात्र त्याच वेळी ते मुलीच्या करवलींनी चोरी केले. त्यामुळे नवऱ्याचा राग अनावर झाला. नवऱ्याने नवरीच्या लोकांना खडे बोल सुनावले. त्यावरून नाराज झालेल्या नवरीनेही लग्नास नकार दिला. नवरीकडील मंडळींनी सुरुवातीला सामंजस्याची भूमिका घेत नवऱ्याला समजवण्याचा प्रयत्न केला परंतु नवरा आणि त्याच्याकडून आलेले नातेवाईक ऐकण्यास तयार नव्हते.
प्रकरण इतके वाढले की भडकलेल्या नवऱ्याने गळ्यातील वरमाला काढून फेकून दिली. त्याशिवाय अंगठीही काढून टाकली. नवऱ्याच्या या वर्तवणुकीवर नवरीही संतापली. नवऱ्याची वागणूक तिला खटकली. त्यानंतर मुलीकडच्या लोकांनीही मुलीची बाजू घेत लग्नास नकार दिला. वाद खूप वाढला. त्यानंतर दोन्ही कडील काही मध्यस्थींनी हस्तक्षेप केला. त्यात बऱ्याच वेळानंतर गोंधळ थांबला आणि दोन्ही कुटुंबाला शांत करण्यात यश आले. या तडजोडीत नवऱ्याकडील मंडळींना नवरीच्या बाजूने झालेला लग्नाचा खर्च द्यावा लागला. त्यानंतर प्रकरण शांत झाले आणि वऱ्हाड तसेच माघारी फिरले.