सावधान... नवरा गिफ्ट आणायला विसरला, बायकोने पळवून पळवून 'धुतला'!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 10:34 IST2019-10-18T10:01:51+5:302019-10-18T10:34:14+5:30
पत्नीसाठी गिफ्ट न आणणं एका पतीला चांगलंच महागात पडलं आहे.

सावधान... नवरा गिफ्ट आणायला विसरला, बायकोने पळवून पळवून 'धुतला'!
गाझियाबाद - पती-पत्नीमध्ये काही कौटुंबिक कारणांवरून वाद झाल्याचा घटना या समोर येत असतात. पण त्यातील काही भांडणं ही काही वेळेस विकोपाला ही जातात. अशीच एक घटना गाझियाबादमध्ये घडली आहे. पत्नीसाठी गिफ्ट न आणणं एका पतीला चांगलंच महागात पडलं आहे. करवा चौथला पत्नीने सोन्याची नथ आणायला सांगितली होती. मात्र फक्त साडी घेऊन पती पोहचल्याने तिचा पारा चांगलाच चढला. गिफ्ट न आणल्याने रागाच्या भरात पतीला पळवून पळवून मारल्याची घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गाझियाबादमध्ये हे दाम्पत्य राहतं. करवा चौथच्या निमित्ताने पत्नीने पतीला गिफ्ट म्हणून सोन्याची नथ आणायला सांगितली होती. मात्र पती फक्त नवीन साडी घेऊनच घरी आला. यामुळे पत्नी नाराज झाली आणि त्या दोघांमध्ये वाद सुरू झाला. पुढे हा वाद टोकाला गेला. संतापलेल्या पत्नीने पतीला काठीने मारायला सुरुवात केली. त्याने तिला समजवण्याचा प्रयत्न केला मात्र पत्नीने त्याचे काहीही ऐकून घेतले नाही. गुरुवारी (17 ऑक्टोबर) सकाळी ही घटना घडल्याची माहिती शेजाऱ्यांनी दिली आहे.
वाद थोडा निवळल्यावर याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी पती-पत्नी दोघेही पोलीस ठाण्यात पोहोचले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती गाझियाबादमधील एका खासगी कंपनीत नोकरी करतो. महिन्याला जवळपास 13 हजार रुपये कमावतो. मात्र यावेळी पैसे नसल्यामुळे त्यांनी करवा चौथला पत्नीसाठी सोन्याची नथ घेतली नाही. त्याने पुढच्या वेळी नथ घेईन असं सांगितलं. मात्र संतापलेल्या पत्नीने त्याचे काहीही ऐकून न घेता वाद सुरू केला तसेच त्याला मारहाण केली आहे. या दाम्पत्याला एक चार वर्षाचा मुलगा आहे. एकमेकांविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी आलेल्या दाम्पत्याची समजूत काढण्यात आली आहे. तसेच आनंदात राहण्याचा सल्ला देऊन घरी परत पाठवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी अहमदाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली होती. पती-पत्नीत काही कारणांमुळे वाद झाला. मात्र हा वाद मिटल्याचं भासवून पतीने पत्नीकडे फ्रेंच किस मागितला. पण फ्रेंच किस न करता पतीने पत्नीची जीभ कापली.