Hunger Strike : Narendra Modi to lead tit for tat fast in row with opposition | Hunger Strike : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विरोधकांविरोधात आज नवी दिल्लीत उपोषण

Hunger Strike : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विरोधकांविरोधात आज नवी दिल्लीत उपोषण

ठळक मुद्देभाजपाचे एकदिवसीय 'निषेध उपोषण' आंदोलनपंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीत करणार उपोषणभाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह कर्नाटकमध्ये करणार उपोषण

नवी दिल्ली - संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्राचे सर्व दिवस विरोधी पक्षांनी गोंधळ घालून वाया घालविल्याचे नैतिक पाप विरोधी पक्षांच्या माथी मारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा अध्यक्ष अमित शाह आज एक दिवसाचा ‘निषेध उपोषण’ करणार आहेत.
मोदी राजधानी नवी दिल्लीत तर कर्नाटकात निवडणूक प्रचार करीत असलेले शाह हुबळी येथे उपोषण करणार आहेत. सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत भाजपाचे हे उपोषण असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उपोषण करणार असले, तरी दिवसभराची त्यांची ठरलेली सरकारी कामे नित्याप्रमाणे सुरू राहतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. गेल्या शुक्रवारी भाजपाच्या स्थापना दिन कार्यक्रमात संसदेचे अधिवेशन वाया गेल्याचा ठपका काँग्रेसवर ठेवत, मोदी यांनी या विरोधी पक्षाने लोकशाहीतील सर्वात खालची पातळी गाठल्याचा आरोप केला होता.

याचा निषेध म्हणून भाजपाचे सर्व खासदार गुरुवारी 12 एप्रिल रोजी एक दिवसाचे उपोषण करतील, असेही मोदी यांनी संसदीय पक्षाच्या बैठकीत जाहीर केले होते. भाजपाच्या वाढत्या ताकदीने पोटदुखी झालेली काँग्रेस देशाचे हित बाजूला ठेवून मुद्दाम फुटपाडू आणि नकारात्मक राजकारण करत असल्याचा आरोप करून, मोदी यांनी भाजपाच्या सर्व खासदारांना व मंत्र्यांना गावोगाव जाऊन सरकारने केलेल्या कल्याणकारी कामांची माहिती देण्यासही सांगितले होते. भाजपाच्या या खेळीला नैतिक काटशह देण्यासाठी काँग्रेसने देशात सांप्रदायिक सलोखा टिकून राहावा, यासाठी भाजपाच्या आधीच 9 एप्रिल रोजी देशव्यापी उपोषण आयोजित केले होते.

संसद अधिवेशन वाया घालविल्याचा ठपका काँग्रेसच्या माथी बसावा, यासाठी संसदीय कामकाजाच्या वाया गेलेल्या 23 दिवसांच्या वेतन व भत्त्यांची 3.66 कोटी रुपयांची रक्कम भाजपा खासदार घेणार नाहीत, असे संसदीय कामकाजमंत्री अनंत कुमार यांनी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी जाहीर केले होते.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Hunger Strike : Narendra Modi to lead tit for tat fast in row with opposition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.