धक्कादायक! पती जिवंत असताना शेकडो महिलांनी लाटली विधवांना दिली जाणारी पेन्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2020 15:26 IST2020-10-15T15:16:54+5:302020-10-15T15:26:24+5:30
Uttar Pradesh News : प्रशासनाने आतापर्यंत अशी १०६ प्रकरणे उघडकीस आणली आहेत. तर अशा ८९१ महिलांची खाती सापडली आहेत. ज्यामध्ये महिलेचा मृत्यू झाला आहे. मात्र आतापर्यंत त्यांच्या बँक खात्यात पेन्शनची रक्कम जात आहे.

धक्कादायक! पती जिवंत असताना शेकडो महिलांनी लाटली विधवांना दिली जाणारी पेन्शन
लखनौ - पती जिवंत असताना तो मृत असल्याचे दाखवून शोकडो महिलांनी विधवा पेन्शन योजनेमधून देण्यात येणाऱ्या पेन्शनचा लाभ घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार उत्तर प्रदेशमधील बदायूं जिल्ह्यात घडला असून, प्रशासनाने आतापर्यंत अशी १०६ प्रकरणे उघडकीस आणली आहेत.
बदायूंच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेतली असून, या महिलांना दिली जाणारी पेन्शन बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या महिलांना आतापर्यंत देण्यात आलेली रक्कमसुद्धा वसूल करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा प्रोबेशन अधिकारी संतोष कुमार यांनी बुधवारी सांगितले की, जिल्ह्यात एकूण १०६ महिला अशा आहेत. ज्यांनी आपल्या पतीला मृत दर्शवून पेन्शनचा लाभ घेतला आहे.
त्यांनी सांगितले की, काही अशीही प्रकरणे आहेत ज्यामध्ये महिलांच्या पहिल्या पतीच्या मृत्यूनंतर त्यांनी पेन्शन घेण्यास सुरुवात केली होती. मात्र दुसऱ्या विवाहानंतर ती बंद करण्यात आलेली नाही. अधिकाऱ्यांनी सांगितले की, जिल्ह्यामध्ये पती जीवित असलेल्या महिलांची पेन्शन रोखण्यात येत आहे आणि पेन्शनच्या रूपात आतापर्यंत त्यांना देण्यात आलेली रक्कमही वसूल करण्यात येणार आहे.
त्यांनी सांगितले की, अशा ८९१ महिलांची खाती सापडली आहेत. ज्यामध्ये महिलेचा मृत्यू झाला आहे. मात्र आतापर्यंत त्यांच्या बँक खात्यात पेन्शनची रक्कम जात आहे. आता ही पेन्शन बंद करण्यात येईल. या संपूर्ण घटनेबाबत बदायूंचे जिल्हाधिकारी कुमार प्रशांत म्हणाले की, काही तक्रारी मिळाल्या आहेत. त्यांचा तपास सुरू आहे. ही एक सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. ज्यामध्ये निरंतर तपास सुरू राहतो. तसेच योग्य ती कारवाई होत असते, असे त्यांनी सांगितले.