मद्य तस्करांसमोर एआय ठरलं फोल; रुग्णवाहिकेतून बाहेर निघाली लाखो रुपयांची विदेशी दारु
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 12:52 IST2025-05-04T12:52:20+5:302025-05-04T12:52:33+5:30
रुग्णाऐवजी रुग्णवाहिकेतून ४२ कार्टन विदेशी दारूची तस्करी करणाऱ्या चालकाला बिहारमध्ये अटक करण्यात आली आहे.

मद्य तस्करांसमोर एआय ठरलं फोल; रुग्णवाहिकेतून बाहेर निघाली लाखो रुपयांची विदेशी दारु
Bihar liquor Smuggling: बिहारच्या मुझफ्फरपूरमधील कांती येथे उत्पादन शुल्क विभागाने एका रुग्णवाहिकेतून ४२ कार्टन विदेशी दारू जप्त केली आहे. रुग्णवाहिकेत खास जागा तयार करुन विदेशी मद्य लपवण्यात आले होते. याप्रकरणी चालक मोहम्मद अनीश याला अटक करण्यात आली असून तो यापूर्वीही तस्करीत सहभागी असल्याचे समोर आलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे रुग्णवाहिकेच्या वरच्या भागातही अशी जागा तयार केली गेली होती जेणेकरुन कोणालाही कळणार नाही. मात्र विभागाला याची माहिती मिळताच त्यांनी कारवाई करत काही लाखांचा माल जप्त केला आहे.
मुझफ्फरपूरमध्ये रुग्णवाहिकेत रुग्णाऐवजी मद्य लपवण्यात आल्याचा प्रकार समोर आला. छतावरील भाग उघडल्यावर उत्पादन विभागाचे पथक देखील थक्क झाले. एका गुप्त माहितीच्या आधारे, बिहारमधील मुझफ्फरपूरमधील उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने कांती पोलीस ठाण्याच्या परिसरात एका रुग्णवाहिकेच्या छताखाली असलेल्या गुप्त भागातून लाखो रुपयांची परदेशी दारू जप्त केली. याप्रकरणी रुग्णवाहिकेच्या चालकालाही अटक करण्यात आली.
"एका गुप्त माहितीच्या आधारे कांती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सादतपूर येथे छापा टाकण्यात आला आणि रुग्णवाहिकेच्या छताखाली बांधलेल्या गुप्त भागातून परदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला. घटनास्थळावरून रुग्णवाहिका चालकालाही अटक करण्यात आली," अशी माहिती उत्पादन शुल्क निरीक्षक दीपक कुमार यांनी दिली.
पोलिसांच्या चौकशीत अटक केलेल्या रुग्णवाहिका चालकाने चौकशीदरम्यान सांगितले की, तो पश्चिम बंगालमधील सिलिगुडी येथून परदेशी दारूचा साठा घेऊन मुझफ्फरपूरला आला होता. दारूचा हा साठा रात्री उशिरा पोहोचवला जाणार होता. यापूर्वीही आपण सिलिगुडीहून परदेशी दारूचा साठा आणला होता. अटक केलेल्या चालकाने उत्पादन शुल्क विभागाला दोन मोठ्या दारू व्यापाऱ्यांची नावे सांगितली आहेत. त्यांना अटक करण्यासाठी आता उत्पादन शुल्क विभागाचे पथक छापे टाकत आहे.
अशातच बिहारमध्ये दारू तस्करांचे मेंदू आर्टिफिशियल इंटेलिजेंसपेक्षाही वेगाने काम करत आहेत. बंगालहून दारूचा एक खेप घेऊन जाणारी एक रुग्णवाहिका मुझफ्फरपूरला व्यवस्थित पोहोचली होती. त्याचदरम्यान, उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने रस्ता अडवला. मात्र रुग्णवाहिका तपासल्यावर सर्व काही सामान्य वाटलं. पण, उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला रुग्णवाहिकेतून दारूची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे अधिकाऱ्यांनी रुग्णवाहिकेच्या छताकडे पाहिलं तेव्हा त्यांना सगळा प्रकार समजला.