भारतीयांना मध्यपूर्वेतून कसं काढणार? दूतावास सज्य म्हणत जयशंकर यांनी राज्यसभेत सांगितला भारताचा 'संपूर्ण प्लॅन'
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 13:41 IST2026-03-09T13:39:34+5:302026-03-09T13:41:27+5:30
"पंतप्रधान स्वतः मध्यपूर्वेतील या घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. आखाती देशांमध्ये सुमारे एक कोटी भारतीय नागरिक वास्तव्यास आहेत. त्यांच्या सुरक्षेसंदर्भात कॅबिनेट समितीच्या (CCS) बैठकीतही चिंता व्यक्त करण्यात आली आहे."

भारतीयांना मध्यपूर्वेतून कसं काढणार? दूतावास सज्य म्हणत जयशंकर यांनी राज्यसभेत सांगितला भारताचा 'संपूर्ण प्लॅन'
अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धामुळे पश्चिम आशियातील तणाव प्रचंड वाढला आहे. या वाढत्या संघर्षावर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी राज्यसभेत चिंता व्यक्त केली. या वादावर भाष्य करताना ते म्हणाले, सर्व मुद्यांवर चर्चेच्या माध्यमाने तोडगा निघावा, असे भारताचे ठाम मत आहे. तसेच, मध्य पूर्वेत अडकलेल्या भारतीय नागरिकांना आर्मेनियामार्गे सुखरूप भारतात आणले जात आहे, अशी माहितीही परराष्ट्र मंत्र्यांनी दिली.
भारताने इराणी जहाजाला दिला आश्रय -
पुढे बोलताना जयशंकर म्हणाले, "मी २८ फेब्रुवारी आणि ५ मार्च रोजी इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा केली आहे. त्यांच्या विनंतीनुसार, हिंदी महासागरात असलेल्या इराणच्या तीन जहाजांपैकी एकाला भारताने आश्रय दिला आहे, ज्याबद्दल इराणने भारताचे आभारही मानले आहेत." भारत शांततेच्या आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या बाजूने असून ऊर्जा गरजांबाबत पूर्णपणे सतर्क आहे.
तेहरानमधील दूतावास हाय-अलर्टवर -
मध्यपूर्वेतील तणावाच्या परिस्थितीत भारताच्या तेहरानमधील दुतावासासंदर्भात बोलताना जयशंकर म्हणाले, तेहरानमधील भारतीय दूतावास पूर्णपणे कार्यरत आणि हाय-अलर्टवर आहे. दूतावासाने अनेक भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यास मदत केली असून, व्यवसायानिमित्त इराणमध्ये गेलेल्या भारतीयांना आर्मेनियामार्गे परत आणले जात आहे.
पंतप्रधान स्वतः मध्यपूर्वेतील या घडामोडींवर लक्ष ठेवून -
याशिवाय, "पंतप्रधान स्वतः मध्यपूर्वेतील या घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. आखाती देशांमध्ये सुमारे एक कोटी भारतीय नागरिक वास्तव्यास आहेत. त्यांच्या सुरक्षेसंदर्भात कॅबिनेट समितीच्या (CCS) बैठकीतही चिंता व्यक्त करण्यात आली आहे. आम्ही जानेवारीतच नागरिकांना सतर्क केले होते. भारत या क्षेत्रातील स्थिरतेसाठी आणि शांततेसाठी कटिबद्ध आहे," असेही जयशंकर यांनी यावेळी संपष्ट कले.