मुंबईत सेल्समॅनचं काम करणारा पीयूष जैन कसा झाला कोट्यधीश; वाचा कशी जमवली इतकी संपत्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 10:54 AM2021-12-29T10:54:15+5:302021-12-29T10:54:39+5:30

कानपूर येथील अत्तर व्यापाऱ्याला ३१ कोटी रुपयांच्या कथित करचोरीच्या आरोपाखाली करण्यात आली होती अटक. टाकलेल्या छाप्यांमध्ये त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात नोटांचं घबाड सापडलं आहे.

How Piyush Jain, a salesman in Mumbai, became a billionaire; Read how to accumulate so much wealth | मुंबईत सेल्समॅनचं काम करणारा पीयूष जैन कसा झाला कोट्यधीश; वाचा कशी जमवली इतकी संपत्ती

मुंबईत सेल्समॅनचं काम करणारा पीयूष जैन कसा झाला कोट्यधीश; वाचा कशी जमवली इतकी संपत्ती

Next

कानपूर येथील अत्तर व्यापाऱ्यारी पीयूष जैन ३१ कोटी रुपयांच्या कथित करचोरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. तपासादरम्यान तो अगदी सामान्य जीवन जगत असलयाचंही समोर आलं आहे. त्याच्या शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तो स्कूटरवरुनच ये-जा करत होता अशी माहिती त्याच्या शेजाऱ्यांनी दिली. अतिशय साधे कपडे परिधान करणं, कोणाच्याही कामात हस्तक्षेप न करणं असा त्यांचा स्वभाव असल्याचंही शेजाऱ्यांनी सांगितलं. पाहूया मुंबईत एक सेल्समॅन म्हणून नोकरी करणारी व्यक्ती अब्जाधीश कशी बनली.

कानपूरस्थित अत्तर व्यापारी पीयूष जैन याला आयकर विभाग आणि जीएसटी इंटेलिजन्सच्या संयुक्त पथकानं त्याच्या बंगल्यावर १२० तासांच्या छाप्यानंतर अटक केली. छाप्यांदरम्यान जैन याच्याकडून सुमारे ३०० कोटी रुपये रोख (नवीन आकडेवारीनुसार) जप्त करण्यात आले. याशिवाय दुबईतील मालमत्तेची कागदपत्रे आणि विदेशी चिन्हे असलेलं सोनंही त्याच्याकडून जप्त करण्यात आलं.

पीयूष जैन याच्या कानपूरमधील घरावर छापा टाकण्यासोबतच अवैधरित्या कमवण्यात आलेले पैसे आणि अन्य पुराव्यांचा तपास मंगळवारी पूर्ण झाला. पीयूष जैन हा अत्यंत राधेपणानं जीवन जगत होता असं त्याच्या शेजाऱ्यांनी इंडिया टुडेशी बोलताना सांगितलं. पीयूष जैन स्कूटरवरुन प्रवास करायचा, तसंच अगदी साधे कपडे परिधान करुन कार्यक्रमांनाही हजर राहायचा, कोणाच्या गोष्टींमध्येही हस्तक्षेप करत नव्हता, असं त्याच्या शेजाऱ्यांनी सांगितलं. एका शेजाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार पीयूष जैनचे आजोबा कपडे तयार करण्याचा व्यवसाय करत होते. त्याचा एक भाऊदेखील आहे. त्या दोघांनी कानपूर विद्यापीठातून केमिस्ट्रीची पदवीही मिळवली होती.

तंबाखू ते अत्तराच्या विक्रीपर्यंतचा प्रवास
त्याच्या अत्तराच्या व्यवसायाच्या सुरुवातीबद्दल, आणखी एका शेजाऱ्याने सांगितलं की, पीयूष जैन मुंबईतील एका कंपनीत सेल्समन म्हणून काम करत होता. रसायनशास्त्रात निष्णात असल्यानं त्यानं साबण, डिटर्जंट इत्यादींचं उत्पादन सुरू केलं. पुढे जाऊन त्यानं कौटुंबिक व्यवसाय हाती घेतला आणि साबण, डिटर्जंटदेखील बनवायला सुरुवात केली. तेथून त्यानं गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांसाठी काही गोष्टी तयार करण्यास सुरुवात केली. हळूहळू त्यानं अत्तराचा व्यवसाय सुरू केला. त्यानंतर पीयूष जैन आपला व्यवसाय वाढवण्यासाठी कन्नौजहून कानपूरला गेला.

पीयूष जैन याच्याकडून रोख रक्कम जप्त केल्यानंतर उत्तर प्रदेशात सपा आणि भाजपमध्ये शाब्दीक चकमक सुरू झाली आहे. जीएसटी इंटेलिजन्स महानिर्देशनालय म्हणजेच डीजीजीआय आणि आयकर विभागाच्या पथकानं कन्नौजच्या अत्तर व्यापारी पीयूष जैन याच्या कानपूर येथील घरावर छापा टाकला होता. यात जैन याच्या कपाटात इतकी रक्कम सापडली होती की ती मोजण्यासाठी मशीन मागवावी लागली होती. एकूण ८ मशीनचा वापर करुन पैसे मोजले जात होते. 

जैनने अलिकडेच ‘समाजवादी अत्तर’ लाँच केले होते. त्याच्या नावावर सुमारे ४० कंपन्या आहेत. त्यात काही शेल कंपन्यांचा समावेश आहे. नोटांनी भरलेल्या कपाटांमध्ये ५०० रुपयांची बंडले होती. जैन याचे मुख्यालय मुंबईत असून, कनौज आणि कानपूर येथे कार्यालये आहेत. तेथेही छापे टाकण्यात आले. जीएसटी इंटेलिजन्सने प्रथम छापे टाकले. तिथे आढळलेली रोख रक्कम पाहून कारवाईत प्राप्तिकर खात्याला सहभागी करून घेण्यात आले. जप्त रक्कम कंटेनरमधून आरबीआयमध्ये नेली.

 

Web Title: How Piyush Jain, a salesman in Mumbai, became a billionaire; Read how to accumulate so much wealth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.