बंगालमध्ये बाबरी मशीद उभारण्यासाठी किती मिळाली देणगी?; पैसे मोजण्यासाठी मागवली मशीन, Video पाहा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 09:48 IST2025-12-08T09:47:21+5:302025-12-08T09:48:13+5:30
हुमायूं कबीर यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर मुर्शिदाबादमधील बाबरी मशीद उभारणीसाठी लोकांकडून मिळालेल्या देणगीची रक्कम मोजत असल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे.

बंगालमध्ये बाबरी मशीद उभारण्यासाठी किती मिळाली देणगी?; पैसे मोजण्यासाठी मागवली मशीन, Video पाहा
पश्चिम बंगालमध्ये पक्षातून हकालपट्टी केलेले टीएमसी आमदार हुमांयू कबीर यांनी अयोध्येतील बाबरी मशिदीच्या धर्तीवर मुर्शिदाबाद येथे एक नवीन मशीद उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर झालेल्या वादानंतर हुमायूं यांनी त्यांच्यासोबत असंख्य मुस्लीम असल्याचा दावा केला. मशिदीच्या निर्मितीसाठी सर्व मुसलमान पुढे येत असल्याचं सांगत त्यांनी लोकांना देणगी देण्याचं आवाहन केले होते. या आवाहनाला मोठ्या प्रमाणात प्रतिसादही मिळाला आहे.
हुमायूं कबीर यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर मुर्शिदाबादमधील बाबरी मशीद उभारणीसाठी लोकांकडून मिळालेल्या देणगीची रक्कम मोजत असल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात काही लोक पैसे मोजताना दिसतात. आतापर्यंत एकूण ११ बॉक्स देणगीचे प्राप्त झालेत. त्यातील रक्कम मोजली जात आहे. ही देणगी मोजण्यासाठी ३० जण काम करत आहेत. त्याशिवाय बँक अकाऊंटच्या माध्यमातून आतापर्यंत ९३ लाख जमा झाल्याची माहिती आमदारांनी दिली. पैसे मोजणीसाठी मशीनही मागवण्यात आली आहे असं हुमायूं यांनी म्हटलं. मात्र भाजपाकडून मिळालेल्या फंडातून मशीद बनवली जात आहे असा आरोप हुमायूं यांच्यावर होत आहे.
हुमायूं यांनी लाईव्ह व्हिडिओ बनवत पैसे मोजण्याचं काम सीसीटीव्हीच्या देखरेखीत सुरू असल्याचे सांगितले. लोकांकडून मिळालेल्या पैशातून बाबरी मशिदीचं काम पूर्ण होईल असं त्यांनी म्हटलं आहे. टीएमसीतून निलंबित केल्यानंतर हुमायूं यांनी एका मुलाखतीत ते २२ डिसेंबरला नव्या पक्षाची घोषणा करणार असल्याचं सांगितले. मी लवकरच एक नवीन पक्ष बनवणार असून तो मुस्लिमांसाठी काम करेल. मी १३५ जागांवर उमेदवार उतरवणार आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकीत गेम चेंजरची भूमिका आमची असेल. त्याशिवाय मी एआयएमआयएमच्या संपर्कात असून आम्ही एकत्रित निवडणूक लढवू असंही हुमायूं कबीर यांनी सांगितले आहे.
भाजपा-तृणमूलमध्ये आरोप प्रत्यारोप
पश्चिम बंगालमधील सत्ताधारी पक्ष असलेल्या तृणमूल काँग्रेसमधून निलंबित आमदार हुमायूं कबीर यांनी बाबरी मशिदीसारख्या मशिदीची पायाभरणी केली आहे. त्यांचे समर्थक विटा घेऊन जाताना दिसले होते. हुमायूं कबीर यांच्या या निर्णयानंतर बंगालमधील राजकीय वर्तुळात मोठा वाद उफाळून आला आहे. भाजपा नेते अमित मालवीय यांनी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ह्या याचा वापर राजकीय लाभासाठी करत आहेत असा आरोप केला तर हुमायूं कबीर हे भाजपा आणि आरएसएसच्या मदतीने जिल्ह्यात अशांतता माजवत आहेत, असा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे.