निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 19:07 IST2025-08-13T19:06:50+5:302025-08-13T19:07:25+5:30

राजीव प्रताप रूडी आणि संजीव बालियान क्लबच्या सचिवपदासाठी आमनेसामने आले होते.

How did a BJP leader defeat Nishikant Dubey?; Rajiv Pratap Rudy winning secretary post in Constitution Club of India | निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले

निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले

नवी दिल्ली - कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडियाच्या निवडणुकीत भाजपाविरुद्धभाजपा असा रंजक सामना पाहायला मिळाला. या निवडणुकीत एकीकडे माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते राजीव प्रताप रूडी उतरले होते तर दुसरीकडे माजी केंद्रीय मंत्री संजीव बालियान उभे होते. निवडणुकीच्या निकालात रूडी यांनी विजय मिळवला. विशेष म्हणजे या निवडणुकीत मतदान करणाऱ्यांमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, किरण रिजिजू, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचा समावेश होता. 

माहितीनुसार, राजीव प्रताप रूडी आणि संजीव बालियान क्लबच्या सचिवपदासाठी आमनेसामने आले होते. सामान्यपणे ही निवड बिनविरोध केली जाते परंतु यावेळी रूडी यांना त्यांच्याच पक्षातून जोरदार टक्कर मिळाली. संजीव बालियान यांच्या समर्थनार्थ भाजपा खासदार निशिकांत दुबे उघडपणे होते तर रूडी यांच्या बाजूने काँग्रेस, सपा आणि टीएमसीचे खासदार होते. या पदासाठी मंगळवारी निवडणूक झाली. त्याचे निकाल बुधवारी आले. त्यात भाजपा खासदार राजीव प्रताप रूडी १०० हून अधिक मतांनी विजयी झाले. रूडी यांच्या पॅनेलने क्लबच्या निवडणुकीत बाजी मारली. 

क्लबच्या पदाधिकाऱ्यांची निवडणूक सहसा कोणत्याही संघर्षाशिवाय होते. यावेळीही सचिव (क्रीडा), सचिव (संस्कृती) आणि कोषाध्यक्ष या पदासाठी काँग्रेसचे राजीव शुक्ला, द्रमुकचे तिरुची शिवा आणि भारत राष्ट्र समितीचे माजी खासदार ए.पी. जितेंद्र रेड्डी यांची बिनविरोध निवड झाली. परंतु सचिव (प्रशासन) पदासाठी भाजपाच्या दिग्गजांमध्ये लढत रंगली. कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडियाच्या निवडणुकीत एकूण १२९५ मतांपैकी ७०७ मते पडली. सचिव प्रशासन पदासाठी रुडी ३९१ मतांनी विजयी झाले तर संजीव बालियान यांना २९१ मते मिळाली.

दरम्यान, कॉन्स्टिट्यूशन क्लबच्या निवडणुकीत मी संजीव बालियान यांच्यासोबत उभा राहिलो. ही निवडणूक ऐतिहासिक होती. त्यातून त्यांची ताकद दिसली. मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी यांनी मत देण्यासाठी येणे त्यातच बालियान विजयी झाले. २००५ आणि २०१० साली निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला मत देण्यासाठीही सोनिया गांधी आल्या नव्हत्या असा टोला निशिकांत दुबे यांनी लगावला आहे. 
 

Web Title: How did a BJP leader defeat Nishikant Dubey?; Rajiv Pratap Rudy winning secretary post in Constitution Club of India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा