गुजरातमध्ये भीषण दुर्घटना; कारखान्याची भिंत कोसळून 12 मजुरांचा, 18 गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 14:52 IST2022-05-18T14:52:09+5:302022-05-18T14:52:16+5:30
गुजरातच्या मोरबी जिल्ह्यात ही घटना घडली. 40 मजुर जेवायला गेल्याने मोठा अनर्थ टळला.

गुजरातमध्ये भीषण दुर्घटना; कारखान्याची भिंत कोसळून 12 मजुरांचा, 18 गंभीर जखमी
मोरबी: गुजरातच्या मोरबी जिल्ह्यात एक भीषण दुर्घटना घडली आहे. जिल्ह्यातील हलवाड येथे एका मीठाच्या कारखान्याची भिंत कोसळल्याने 30 मजूर ढिगाऱ्याखाली गाडले गेले. यातील 12 मजुरांचा मृत्यू झाला तर 18 जण जखमी झाले. या घटनेनंतर जेसीबी मशिनच्या सहाय्याने भिंत उचलून मृत व जखमींना बाहेर काढण्यात आले. जखमींना शहरातील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हलवड जीआयडीसी येथील सागर सॉल्ट नावाच्या कारखान्याची भिंत दुपारी बाराच्या सुमारास कोसळली. यावेळी 30 मजूर कारखान्यात काम करत होते. त्यांच्यासोबत काही मजुरांची मुलेही होती, ती ढिगाऱ्याखाली आल्याची माहिती मिळत आहे. मात्र, कंपनीकडून अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. भिंत कोसळल्यानंतर स्थानिकांनी बचावकार्य सुरू केले. घटनेनंतर स्थानिक आमदार परशोत्तम साबरिया हेही घटनास्थळी पोहोचले. भिंत कशामुळे कोसळली हे अद्याप समजू शकलेले नाही.
40 हून अधिक कामगार जेवायला गेले होते
भिंतीजवळ बसून कामगार मीठ बांधत होते. यादरम्यान संपूर्ण भिंत त्यांच्या अंगावर कोसळली. अपघाताच्या अर्धा तास आधी येथे 70 हून अधिक मजूर काम करत होते, मात्र यातील 40 हून अधिक मजूर जेवायला बाहेर पडले होते. अन्यथा आणखी कामगारांचा मृत्यू झाला असता. कंपनीतील काही कामगारांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात मृत्युमुखी पडलेले मजूर हे राधानपूर तालुक्यातील गावातील रहिवासी आहेत.