भयंकर! १२०च्या स्पीडने कार चालवत तरुणाने चौघांना चिरडलं; मुलीसाठी रंग आणायला गेलेल्या आईचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 20:23 IST2025-03-14T20:22:38+5:302025-03-14T20:23:05+5:30
वेग जास्त असल्याने तरुणाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि या कारने रस्त्यावरील चार जणांना धडक दिली.

भयंकर! १२०च्या स्पीडने कार चालवत तरुणाने चौघांना चिरडलं; मुलीसाठी रंग आणायला गेलेल्या आईचा मृत्यू
Accident News: देशभर होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतानाच गुजरातच्या बडोद्यात भीषण अपघात झाला आहे. २० वर्षीय तरुणाने भरधाव वेगात कार चालवत चार जणांना चिरडलं. यामध्ये एका महिलेचा मृ्त्यू झाला असून अन्य तिघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बडोद्यातील करेलीबाग परिसरात गुरुवारी रात्री उशिरा रक्षित चौरसिया हा आपल्या मित्रासह दारू प्राशन करून भरधाव वेगात कार चालवत होता. वेग जास्त असल्याने त्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि या कारने रस्त्यावरील चार जणांना धडक दिली. या अपघातात एक महिला ठार झाली असून अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. होळीच्या सणानिमित्त आपल्या मुलीसाठी रंग खरेदी करण्यासाठी गेलेल्या महिलेच्या मृत्यूने परिसरावर शोककळा पसरली आहे.
मद्यधुंद अवस्थेत कार चालवणारा रक्षित चौरसिया हा मूळचा उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. तो बडोद्यात कायद्याची पदवी घेण्यासाठी आला होता. तर अपघातग्रस्त कारचा मालक असलेल्या दुसऱ्या आरोपीचं नाव मित चौहान असं असून तो मूळचा बडोद्याचाच रहिवासी आहे.
दरम्यान, पोलिसांनी दोन्ही तरुणांना ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर पुढील कारवाई केली जात आहे.