Delhi Blast: दिल्लीत बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांना धडा शिकवला जाणार, अमित शहांची गुप्तचर अधिकाऱ्यांसोबत बैठक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 15:31 IST2025-11-13T15:27:00+5:302025-11-13T15:31:41+5:30
Delhi Blast News: दिल्ली बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली.

Delhi Blast: दिल्लीत बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांना धडा शिकवला जाणार, अमित शहांची गुप्तचर अधिकाऱ्यांसोबत बैठक
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण कार बॉम्बस्फोटानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज (गुरुवार, १३ नोव्हेंबर) सकाळी एक उच्चस्तरीय बैठक बोलावली. गुप्तचर संस्था आणि गृह मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली, ज्यात दहशतवादी हल्ल्याच्या तपासाच्या प्रगतीचा आणि देशभरातील सुरक्षा व्यवस्थेचा सखोल आढावा घेण्यात आला.
अमित शहा यांच्या निवासस्थानी झालेल्या या महत्त्वाच्या बैठकीला राष्ट्रीय तपास संस्थाचे महासंचालक, गुप्तचर विभागाचे संचालक, गृहसचिव आणि दिल्ली पोलीस आयुक्त उपस्थित होते. यावेळी अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय राजधानी दिल्ली आणि इतर प्रमुख शहरांमधील सध्याच्या सुरक्षा परिस्थितीची माहिती गृहमंत्र्यांना दिली. शहा यांनी अधिकाऱ्यांना कडक सुरक्षा उपाययोजना राबवण्याचे आणि सर्व संवेदनशील ठिकाणी दक्षता वाढविण्याचे निर्देश दिले.
दिल्लीतील बॉम्बस्फोटानंतर वाढलेल्या सुरक्षा परिस्थितीमुळे गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांचा आजचा दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहा अहमदाबाद फूड फेस्टिव्हल आणि अहमदाबाद आंतरराष्ट्रीय पुस्तक महोत्सव २०२५ चे उद्घाटन करणार होते, तसेच मेहसाणा येथील दूधसागर डेअरीच्या उद्घाटन कार्यक्रमांसाठीही त्यांना आमंत्रित करण्यात आले होते. भाजप नेते बिमल जोशी यांनी सांगितले की, गृहमंत्र्यांचा अहमदाबाद आणि मेहसाणा दौरा रद्द करण्यात आला आहे. परंतु, ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
सोमवारी संध्याकाळी लाल किल्ल्याजवळ झालेल्या या कार बॉम्ब स्फोटात किमान १२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, अनेक जण जखमी झाले. घटनेनंतर लगेचच अमित शहा यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास जलद करण्याचे निर्देश दिले. त्यांनी मंगळवारीही दोन सुरक्षा आढावा बैठका घेतल्या होत्या.