याला म्हणतात नशीब! पिठाची गिरणी चालवणारा रातोरात झाला ५० लाखांचा मालक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 16:50 IST2026-03-27T16:50:19+5:302026-03-27T16:50:52+5:30
पंजाबच्या फाजिल्का जिल्ह्यातील सजनाना गावचे रहिवासी जरनैल सिंह यांचं नशीब रातोरात फळफळलं आहे.

फोटो - ABP News
पंजाबच्या फाजिल्का जिल्ह्यातील सजनाना गावचे रहिवासी जरनैल सिंह यांचं नशीब रातोरात फळफळलं आहे. पिठाची गिरणी चालवणाऱ्या जरनैल सिंह यांनी फाजिल्का येथील 'रूपचंद लॉटरी स्टॉल'वरून होळी बंपर लॉटरीचं तिकीट खरेदी केलं होतं. जेव्हा या लॉटरीचा निकाल जाहीर झाला, तेव्हा त्यांच्या तिकीटाला ५० लाख रुपयांचं पहिलं बक्षीस मिळाल्याचं समोर आलं.
रूपचंद लॉटरी स्टॉलचे चालक बॉबी यांनी सांगितलं की, ते गेल्या काही दिवसांपासून विजेत्याचा शोध घेत होते, कारण तिकीट खरेदी करताना विजेत्याने आपलं नाव किंवा नंबर स्टॉलवर नोंदवला नव्हता. अखेर १२ दिवसांनंतर बॉबी यांनी जरनैल सिंह यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना या मोठ्या बक्षिसाची माहिती दिली. हे ऐकताच जरनैल सिंह यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. संपूर्ण सजनाना गावात या विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला आणि गावकऱ्यांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला.
जरनैल सिंह हे सजनाना गावातील 'ढाणी माछीराम लाहौरिया' येथे राहतात. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी ते गेल्या अनेक वर्षांपासून पिठाची गिरणी चालवत आहेत. "एका छोट्याशा लॉटरीच्या तिकिटामुळे माझ्या आयुष्यात इतका मोठा आनंद येईल, असा विचारही मी कधी केला नव्हता," अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
हा विजय त्यांच्यासाठी मोठा आर्थिक आधार ठरणार असून, यामुळे त्यांच्या कुटुंबाचं जीवन पूर्णपणे बदलून जाणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की, मेहनतीला जर नशिबाची साथ मिळाली तर माणसाचं आयुष्य कोणत्याही क्षणी पालटू शकतं. सध्या फाजिल्का परिसरात या घटनेची जोरदार चर्चा असून जरनैल सिंह यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.