26 जानेवारीला राजपथावर धडक, शेतकऱ्यांचा इशारा; आंदोलन आणखी तीव्र करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2020 01:23 AM2020-12-27T01:23:21+5:302020-12-27T07:00:10+5:30

१ जानेवारी रोजी नववर्ष दिनी ‘संयुक्त किसान मोर्चा’तर्फे याची घोषणा केली जाईल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. 

Hit the highway on January 26, warning farmers; The agitation will intensify | 26 जानेवारीला राजपथावर धडक, शेतकऱ्यांचा इशारा; आंदोलन आणखी तीव्र करणार

26 जानेवारीला राजपथावर धडक, शेतकऱ्यांचा इशारा; आंदोलन आणखी तीव्र करणार

Next

-विकास झाडे

नवी दिल्ली : गेल्या ३२ दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला असून, २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी थेट राजपथावरच ट्रॅक्टर मोर्चा नेण्याचा संकल्प सोडला आहे. १ जानेवारी रोजी नववर्ष दिनी ‘संयुक्त किसान मोर्चा’तर्फे याची घोषणा केली जाईल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. 

सिंघू सीमेवर पंजाबी आणि जाट तर गाझीपूर सीमेवर उत्तर प्रदेश आणि उत्तरांचलचे शेतकरी, तसेच राजधानी दिल्लीकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांच्या सीमारेषांवर हजारो शेतकरी गेल्या ३२ दिवसांपासून आंदोलन करत आहेत. आम्ही आमचा अधिकार मिळवू, असा संकल्प शेतकऱ्यांनी केला आहे, परंतु, सरकार आमचे ऐकणारच नसेल, तर येत्या प्रजासत्ताक दिनी कितीही विरोध झाला, तरी राजपथावरून शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर धावतील, यासाठी रणनीती तयार केली जात आहे. 

दोन दिवसांपूर्वी शेतकरी नेत्यांनी आवाहन केल्याप्रमाणे हजारो शेतकरी पंजाब, हरयाणा, राजस्थान, उत्तरांचल, उत्तर प्रदेशमधून दिल्लीकडे निघाले आहेत. आतापर्यंत हे आंदोलन शांततेत सुरू आहे. पुढेही उद्रेक होऊ नये, म्हणून नेते काळजी घेत आहेत. संयुक्त किसान मोर्चाच्या बैठकीत रविवारपासून पंजाब व हरयाणामधील टोल नाके वसुलीसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. ३० डिसेंबर रोजी कुंडली द्रुतगती महामार्गावर ट्रॅक्टर मोर्चा काढला जाईल. नववर्षाच्या स्वागतासाठी दिल्ली व परिसरातील नागरिकांना शेतकऱ्यांसोबत लंगरमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार रघू राय असो की, कॅनडाचा गायक जैजी. सामाजिक कार्यकर्ते किंवा वकिलांच्या संघटना, चित्रपटसृष्टीतील कलाकार सीमेवर शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी झाले. राजस्थानच्या शिक्षक संघाने आंदोलनाला 
पाठिंबा  दिला  आहे.

२९ डिसेंबरला शेतकरी सरकारशी चर्चा करणार 

संयुक्त किसान मोर्चाने कृषी मंत्रालयाचे संयुक्त सचिव विवेक अग्रवाल यांना २४ डिसेंबरच्या पत्राचे उत्तर पाठविले आहे. संघटनेने सरकार दिशाभूल करीत असल्याकडे लक्ष वेधले. आम्ही प्रत्येक चर्चेत तीनही कायदे मागे घेण्याची मागणी केली. आम्ही २९ डिसेंबर रोजी सकाळी 
११ वाजता तुमच्याशी चर्चा करण्यास तयार आहोत, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. बैठकीत कृषी कायदे रद्द करण्याबाबत सरकारने उचललेले पाऊल, एमएसपीबाबत कायदेशीर खात्री, एनसीआरमध्ये हवेच्या गुणवत्तेसाठी दंड करण्याच्या कायद्यातून वगळणे व वीज संशोधन विधेयक प्रारूपात बदल या मुद्द्यांवर चर्चा होईल.

पंजाबातून १५ हजार शेतकरी निघाले 

पंजाबच्या संगरूर येथून १५ हजार शेतकरी खनौरी सीमेकडे रवाना झाले आहेत. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हे शेतकरी रविवारी दाबवाली सीमेहून दिल्लीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करतील. मात्र, सुरक्षा यंत्रणा चोख असल्याने त्यांना सीमेवर अडविले जाईल. शनिवारी गाझीपूर सीमेवर पंजाबातून दोन हजार शेतकरी पोहोचले.

Web Title: Hit the highway on January 26, warning farmers; The agitation will intensify

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.