मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 16:17 IST2025-08-04T16:16:01+5:302025-08-04T16:17:04+5:30

निवडणुकीसाठी हे राजकारण केले जाते मात्र यंदाच्या मुंबई महापालिका निवडणुकीनंतर मनसे आणि उद्धव ठाकरे यांचे राजकारण पूर्णत: मुंबईतून संपून जाईल असं निशिकांत दुबे यांनी म्हटलं.

Hindi speakers made a huge contribution in building Mumbai, Marathi People only 30 percent...: BJP Nishikant Dubey target Raj thackeray and Uddhav Thackeray | मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं

मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं

मुंबई - मागील काही दिवसांपासून सुरू असलेला मराठी आणि हिंदी भाषिक वाद संपण्याची चिन्हे नाहीत. त्यात भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी माणसाला डिवचण्याचं काम केले आहे. उत्तर प्रदेश, बिहारी आणि हिंदी भाषिकांचं मुंबई बनवण्यात मोठे योगदान आहे. आम्हीच योगदान दिले असं मी बोलत नाही परंतु आम्हीही योगदान दिले आहे असं सांगत मुंबईतील लोकसंख्येत केवळ ३० टक्के मराठी भाषिक असल्याचं दुबे यांनी म्हटलं. 

एका मुलाखतीत निशिकांत दुबे म्हणाले की, मुंबई बनवण्यात उत्तर प्रदेश, बिहार आणि हिंदी भाषिकांचे मोठे योगदान आहे. आजही जी अर्थव्यवस्था आहे त्यात आम्हीही योगदान देत आहोत. केवळ आम्हीच करतोय असं मी बोलत नाही परंतु आम्हीही करतोय. तुम्ही कोणत्या आधारे बोलता, केवळ ३० टक्के लोक मुंबईत मराठी बोलतात. १२ टक्के लोक उर्दू बोलतात म्हणजे ते मुस्लीम आहे. जवळपास ३० टक्केच हिंदी भाषिक आहेत. २ ते अडीच टक्के राजस्थानी बोलतात, कुणी गुजराती बोलतात, भोजपुरी बोलतात. त्यामुळे भाषेच्या आधारे त्यांचा हेतू साध्य होणार नाही. आता भौगोलिक बदल झालाय हे त्यांनी समजून घेतले पाहिजे. निवडणुकीसाठी भाषेचे राजकारण केले जाते मात्र यंदाच्या मुंबई महापालिका निवडणुकीनंतर मनसे आणि उद्धव ठाकरे यांचे राजकारण पूर्णत: मुंबईतून संपून जाईल. कारण पैसे कमवण्याचं साधन बंद झाले, सर्वांनी यांच्याविरोधात मते दिली तर ते यापुढचं असं राजकारण करण्याची त्यांना संधी मिळणार नाही असं त्यांनी म्हटलं. 

तसेच हा जो वाद आहे त्याने मनाला वेदना होतात. या देशात अनेक असे प्रदेश आहेत ज्यांची प्रादेशिक भाषा हिंदी आहे हे तुम्ही मानू शकता. संपर्काची भाषा हिंदी आहे. मग ते उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगड, राजस्थान आणि दिल्ली असेल. मराठी भाषेबद्दल मला आदर आहे. मराठी देवनागरीत लिहिली जाते. त्यात तुम्ही एखाद्याला मारहाण करत असेल तर त्यांच्याकडे काय मार्ग आहेत, त्यामुळे मी त्यांच्याबद्दल बोललो. महाराष्ट्र, मुंबई बनवण्यात उत्तर प्रदेश, बिहार आणि हिंदी भाषिकांचे योगदान आहे. ब्रिटीश भारतात आले तेव्हा तुम्ही इंग्रजी बोलायला लागला. त्याआधी इंग्रजी बोलली जात नव्हती असंही खासदार निशिकांत दुबे यांनी सांगितले. डीडी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केले. 

दरम्यान, निशिकांत दुबेला फार महत्त्व द्यायची गरज नाही. जो महाराष्ट्रविरुद्ध, मराठी माणसांविरोधात बोलतोय आणि त्या बोलण्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समर्थन करत आहेत. दिल्लीतील लोकांनी या प्रवृत्तीला खतपाणी घालू नये. हा महाराष्ट्राच्या, मराठी माणसांच्या अस्मितेचा विषय आहे. असे अनेक दुबे आले आणि गेले. मुंबईसह महाराष्ट्र अखंड आहे. १०६ हुतात्म्यांनी बलिदान देऊन मुंबई मिळाली आहे. त्यात दुबे, चौबे, मिश्रा नाहीत. हे निशिकांत दुबे यांनी समजून घेतले पाहिजे. छातीचा कोट करून महाराष्ट्र लढला, गिरणी कामगार लढला तेव्हा ही मुंबई मराठी माणसाला मिळाली. तुम्ही इथं पैसे कमवायला आलात, तुमच्या राज्यात नोकरी धंदे नसल्याने मुंबईत आलात. इथला पैसा तुम्ही राज्याबाहेरच घेऊन चालला आहे. मुंबईतील मराठी माणसांच्या पोटावर लाथ मारून तुम्ही मुंबईत लुटत आहात असा पलटवार खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

Web Title: Hindi speakers made a huge contribution in building Mumbai, Marathi People only 30 percent...: BJP Nishikant Dubey target Raj thackeray and Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.