Himachal Pradesh: सुखविंदर सिंह सुखू झाले हिमाचल प्रदेशचे नवे मुख्यमंत्री तर मुकेश अग्निहोत्री उपमुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2022 02:59 PM2022-12-11T14:59:12+5:302022-12-11T14:59:52+5:30

सुखविंदर सिंह सुखू यांनी हिमाचलचे 15वे मुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेतली.

Himachal Pradesh: Sukhwinder Singh Sukhu became 15th Chief Minister of Himachal Pradesh and Mukesh Agnihotri the Deputy Chief Minister | Himachal Pradesh: सुखविंदर सिंह सुखू झाले हिमाचल प्रदेशचे नवे मुख्यमंत्री तर मुकेश अग्निहोत्री उपमुख्यमंत्री

Himachal Pradesh: सुखविंदर सिंह सुखू झाले हिमाचल प्रदेशचे नवे मुख्यमंत्री तर मुकेश अग्निहोत्री उपमुख्यमंत्री

googlenewsNext

Himachal Pradesh News: सुखविंदर सिंह सुखू (Sukhvinder Singh Sukhu) यांनी हिमाचल प्रदेशचे 15 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. शिमला येथील रिज मैदानावर हिमाचलचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी सखू यांना मंत्रिपदाची शपथ दिली. सखू यांच्यासोबत काँग्रेस नेते आणि प्रतिभा सिंह यांचे निकटवर्तीय मुकेश अग्निहोत्री (Mukesh Agnihotri) यांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते सखु यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते.

हिमाचलचे नवे उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री यांनी शपथ घेतल्यानंतर वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, पहिल्या कॅबिनेट बैठकीत जनतेला दिलेली आश्वासने आम्ही पूर्ण करू. जुनी पेन्शन योजना पूर्ववत केली जाईल. काँग्रेस कोणत्याही राज्यात सत्तेवर येणार नाही, असे पूर्वी लोक म्हणायचे, पण आज आम्ही भाजपचा रथ रोखला आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

काँग्रेसचे हे दिग्गज उपस्थित होते

मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियांका गांधी वाड्रा, अशोक गेहलोत, सचिन पायलट, भूपेश बघेल, भूपेंद्र सिंग हुडा, राजीव शुक्ला, प्रतिभा सिंग यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते सुखविंदर सिंग सुखू यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. सुखविंदर सिंग सुखूची आई संसार देवी शपथविधी सोहळ्यापूर्वी शिमल्याच्या संजोली हेलिपॅडवर पोहोचल्या. येथे सुखूंनी त्यांचे स्वागत केले. मुलगा यापुढेही जनतेची सेवा करणार असल्याची प्रतिक्रिया त्यांच्या आईने दिली.

सुखू प्रतिभा सिंह यांच्या घरी पोहोचले
शपथविधीपूर्वी सुखविंदर सिंह सुखू यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष प्रतिभा सिंह यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती. प्रतिभा सिंह यांची भेट घेतल्यानंतर सखू म्हणाले की, प्रतिभा सिंह या राज्यातील पक्षाच्या प्रमुख आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वजण काम करतात. त्यामुळेच ते त्यांना शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी आले होते. सूखू यांच्या शपथविधी सोहळ्याला मी नक्कीच उपस्थित राहीन, असे प्रतिभा म्हणाल्या होत्या.

सामान्य कार्यकर्त्यांवर मोठ्या जबाबदाऱ्या येत आहेत : सुखू
शपथ घेण्यापूर्वी मीडियाशी बोलताना मुख्यमंत्री सुखू म्हणाले की, आता राजकारण बदलत आहे आणि काँग्रेसमध्ये सामान्य कार्यकर्त्यांना मोठ्या जबाबदाऱ्या मिळत आहेत. हिमाचलच्या निकालामुळे देशाच्या राजकारणात मोठा बदल होणार आहे. दरम्यान, शिमला ग्रामीणचे दुसऱ्यांदा आमदार असलेले आणि माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे पुत्र विक्रमादित्य म्हणाले की, काँग्रेस पक्षात कोणत्याही प्रकारचा वाद नाही. पक्षाने कोणत्याही प्रकारची जबाबदारी दिल्यास खरा सैनिक म्हणून जबाबदारी पार पाडली जाईल. सीएम सुखविंदर सिंग सुखू यांनी संवादादरम्यान सांगितले होते की, विक्रमादित्य यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल.

हिमाचलचे नवे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुखू कोण आहेत?
सुखविंदर सिंह सुखू हे हिमाचल प्रदेशच्या काँग्रेस प्रचार समितीचे प्रमुख आहेत. नादौन मतदारसंघातून ते पाचव्यांदा आमदार झाले आहेत. यावेळी त्यांनी भाजपच्या विजय अग्निहोत्री यांचा 3363 मतांनी पराभव केला आहे. सुखूंनी आपल्या राजकीय कारकिर्दीला विद्यार्थी नेता म्हणून सुरुवात केली. 1999 ते 2008 दरम्यान ते युवक काँग्रेसचे प्रमुख होते. सुखू हे दोन वेळा सिमला नगरपालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. ते 2013 मध्ये हिमाचल काँग्रेसच्या प्रमुखपदी पोहोचले आणि 2019 पर्यंत राज्य युनिटचे प्रमुख राहिले.

कोण आहेत उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री?
मुकेश अग्निहोत्री यांनी सलग 5 वेळा निवडणूक जिंकली आहे. 2012 ते 2017 या काळात ते वीरभद्र सिंह यांच्या सरकारमध्ये उद्योगमंत्री होते. याशिवाय संसदीय कामकाज, माहिती आणि जनसंपर्क याशिवाय त्यांनी कामगार आणि रोजगार विभागाची जबाबदारीही सांभाळली आहे. हिमाचलचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांनी त्यांना 2003 मध्ये संतोखगड मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास सांगितले. त्यानंतर 2007 मध्येही ते तिथून निवडणूक जिंकले. 2008 मध्ये संतोषगडचे हरोली विधानसभा जागेत रूपांतर झाले. मुकेश अग्निहोत्री 2012 मध्ये येथून तिसऱ्यांदा निवडून येण्यात यशस्वी झाले आणि त्यांना वीरभद्र सिंह यांच्या सरकारमध्ये मंत्री करण्यात आले. काँग्रेसने 2018 मध्ये फायर ब्रँड नेते आणि उत्तम वक्ता अग्निहोत्री यांना विरोधी पक्षनेते केले.

Web Title: Himachal Pradesh: Sukhwinder Singh Sukhu became 15th Chief Minister of Himachal Pradesh and Mukesh Agnihotri the Deputy Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.