Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 16:33 IST2025-07-03T16:33:23+5:302025-07-03T16:33:53+5:30
Himachal Flood : हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस पाहायला मिळाला आहे. गेल्या १२ दिवसांत राज्यात ६३ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १०९ जण जखमी झाले आहेत.

Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान
हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस पाहायला मिळाला आहे. गेल्या १२ दिवसांत राज्यात ६३ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १०९ जण जखमी झाले आहेत. तसेच ४० जण अजूनही बेपत्ता आहेत. भूस्खलन आणि मुसळधार पावसामुळे राज्यात आतापर्यंत तब्बल ४०७ कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे.
भूस्खलनामुळे २६१ रस्ते बंद आहेत, ५९९ ट्रान्सफॉर्मर ठप्प झाले आहेत आणि ७९४ पिण्याच्या पाण्याच्या योजनांवर मोठा परिणाम झाला आहे. २४७ प्राणी-पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे, १४ घरं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत आणि ५७ घरांचं मोठं नुकसान झालं आहे, तर १७९ गोशाळा वाहून गेल्या आहेत.
हवामान विभागाने पुढील २४ तासांसाठी कांगडा, मंडी, शिमला, सोलन, सिरमौर आणि हमीरपूर जिल्ह्यांमध्ये अचानक पूर येण्याचा इशारा जारी केला आहे. विभागाने आज आणि उद्यासाठी यलो अलर्ट आणि ५ ते ९ जुलै दरम्यान ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. काल रात्री सिरमौर, हमीरपूर आणि शिमलासह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडला.
मंडी जिल्ह्यातील सिराज भागात ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे आणि ३४ जण बेपत्ता आहेत. एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि प्रशासनाच्या पथके मदत कार्यात गुंतलेली आहेत. हवामान खात्याने लोकांना नद्या आणि नाल्यांपासून दूर राहण्याचा आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे.