"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 11:52 IST2025-07-30T11:51:14+5:302025-07-30T11:52:00+5:30
एका सब-इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर त्याच्या दोन्ही बायका मृतदेह घेण्यासाठी एकमेकांशी भिडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
लखनौमध्ये एका सब-इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर त्याच्या दोन्ही बायका मृतदेह घेण्यासाठी एकमेकांशी भिडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोघींमुळे खूप गोंधळ झाला, परिस्थिती हाणामारीपर्यंत पोहोचली. घटनास्थळी पोहोचलेल्या गुडांबा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी कसा तरी वाद शांत केला. अखेर मृतदेह सब-इन्स्पेक्टरच्या वडिलांकडे सोपवण्यात आला आणि जौनपूरमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, सब-इन्स्पेक्टर संजय पाठक यांनी दोनदा लग्न केलं होतं. ते ओरईमध्ये तैनात होते आणि त्यांच्या दुसऱ्या पत्नीसोबत लखनौमध्ये राहत होते. पहिली पत्नी जौनपूरमध्ये राहत होती. त्यांच्यापासून त्यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे. सोमवारी रात्री सब-इन्स्पेक्टरची प्रकृती अचानक बिघडली. रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
पहिली पत्नी चंद्रकुमारी ही कुटुंबासह लखनौला पोहोचली. मंगळवारी, जेव्हा शवविच्छेदनानंतर मृतदेह घेण्याची वेळ आली तेव्हा दुसरी पत्नी आराधना आणि चंद्रकुमारी यांच्यात वाद सुरू झाला. एकीकडे चंद्रकुमारी मृतदेह तिच्याकडे सोपवण्याची मागणी करू लागली. दुसरीकडे, आराधना देखील मृतदेहावर दावा करू लागली. हा माझाच नवरा म्हणत दोन्ही महिला मृतदेहासाठी भांडत होत्या.
गोंधळ वाढताच स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी हस्तक्षेप केला. चर्चेनंतर मृतदेह वडिलांकडे सोपवण्यात आला. वडील मृतदेह घेऊन जौनपूरला रवाना झाले. त्यांनीच अंत्यसंस्कार केले. शवविच्छेदन अहवालात निरीक्षक संजय पाठक यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. गुडांबा पोलिसांनी सांगितले की, सोमवारी रात्री निरीक्षकाची प्रकृती अचानक बिघडली, त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. मंगळवारी शवविच्छेदन करण्यात आले. तपास सुरू आहे.