A high-speed train will run along the Green Highway, | ग्रीन हायवेजच्या बाजूने जाणार हायस्पीड ट्रेन, दिल्ली-मुंबई, मुंबई-नागपूरचा समावेश

ग्रीन हायवेजच्या बाजूने जाणार हायस्पीड ट्रेन, दिल्ली-मुंबई, मुंबई-नागपूरचा समावेश

यदु जोशी

मुंबई : देशात उभारण्यात येत असलेल्या २२ ग्रीन हायवेजना लागून हायस्पीड ट्रेन सुरू करण्याचा प्रस्ताव केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने रेल्वे मंत्रालयाला दिला असून त्यात दिल्ली-मुंबई, मुंबई-नागपूर हायस्पीड ट्रेनचा समावेश आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी लोकमतला ही माहिती दिली. मध्यंतरी मी इन्फ्रास्ट्रक्चर कमिटीची बैठक घेतली. त्यात रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांना प्रस्ताव दिला. त्यांनी या प्रस्तावाचे स्वागत केले आहे. लवकरच निर्णय अपेक्षित असल्याचे गडकरी म्हणाले. ग्रीन हायवेजसाठी आम्ही आधीच भूसंपादन करीत आहोत, त्यामुळे हायस्पीड ट्रेन वा अन्य सुविधांसाठी वेगळे भूसंपादन करावे लागणार नाही आणि पैशांचीही मोठ्या प्रमाणात बचत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
भारतीय रेल्वे आणि 

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएमएआय) यांचा हा उपक्रम असेल. रस्ते व रेल्वे वाहतुकीचा हा एक महत्त्वाकांक्षी एकात्मिक विकास प्रकल्प असेल. रेल्वेशीे समन्वय साधण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाने चार अधिकाऱ्यांची एक समिती नियुक्त केली आहे. बुलेट ट्रेनचा वेग सुरुवातीला ३०० किमी प्रति तास इतका असेल. या सात मार्गांसाठीची ब्ल्यू प्रिंट ही भारतीय रेल्वेकडून सध्या तयार केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्याच्या अर्थव्यवस्थेला गतिमान करणाºया हायस्पीड ट्रेनचे मोठे जाळे विणले जाणार आहे. १) मुंबई-नाशिक-औरंगाबाद-अकोला-बडनेरा-नागपूर २) मुंबई-पुणे-हैदराबाद हायस्पीड ट्रेनचा पहिल्या सात मार्गांमध्ये समावेश आहे. याशिवाय दिल्ली-मुंबई, सुरत-नाशिक-अहमदनगर मार्गे पुढे हैदराबाद यांचाही २२ मार्गांमध्ये समावेश आहे.

देशात २२ ग्रीन हायवेज आम्ही बांधत आहोत. त्यातील सातचे काम सुरू झालेले आहे. १२० मीटर रुंदीचे हे हायवे आहेत. आम्हाला रस्त्यासाठी त्यातील केवळ ४८ मीटर जागा लागणार आहे. उर्वरित जागेत बुलेट ट्रेन, गॅस पाईपलाइन, जलवाहिन्या टाकता येतील. तसेच हायपर लूपही उभारता येईल, असे आम्ही प्रस्तावित केले आहे.
- नितीन गडकरी, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री

पहिल्या टप्प्यातील
सात मार्ग असे असतील
१. दिल्ली-नोएडा-आग्रा-
लखनौ-वाराणसी
२. दिल्ली-जयपूर-उदयपूर-अहमदाबाद
३. मुंबई-औरंगाबाद-नाशिक-नागपूर
४. मुंबई-पुणे-हैदराबाद
५. चेन्नई-बंगलोर-म्हैसूर
६. दिल्ली-चंडिगड-लुधियाना-जालंधर-अमृतसर
७. हावडा-पाटणा-नवी दिल्ली.

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: A high-speed train will run along the Green Highway,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.