देशातील सर्वात मोठा हाय-टेक परीक्षा घोटाळा उघड! जमिनीखाली चेंबर बनवून पेपर रिमोटने सोडवला; दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 13:28 IST2026-02-15T13:23:39+5:302026-02-15T13:28:05+5:30

रिमोट ॲक्सेसने सोडवला जात होता SSC चा पेपर; एसटीएफकडून महादेव डिजिटल सेंटरचा पर्दाफाश

Hidden Underground Chamber & Remote Access Uttarakhand STF Unearths Shocking Hi Tech SSC Exam Scam | देशातील सर्वात मोठा हाय-टेक परीक्षा घोटाळा उघड! जमिनीखाली चेंबर बनवून पेपर रिमोटने सोडवला; दोघांना अटक

देशातील सर्वात मोठा हाय-टेक परीक्षा घोटाळा उघड! जमिनीखाली चेंबर बनवून पेपर रिमोटने सोडवला; दोघांना अटक

Dehradun Online Exam Racket: उत्तराखंडपोलिसांनी एका अशा हाय-टेक टोळीचा पर्दाफाश केला आहे, ज्यांनी परीक्षेतील चोरीचा नवा आणि धक्कादायक मार्ग शोधला होता. कर्मचारी निवड आयोगामार्फत आयोजित मल्टि-टास्किंग स्टाफ आणि हवालदार भरती परीक्षेत तांत्रिक फेरफार करून पेपर फोडणाऱ्या रॅकेटला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या अँटी-चीटिंग कायद्यांतर्गत ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.

जमिनीखाली २४ इंचाचे गुप्त चेंबर

देहरादून येथील महादेव डिजिटल झोन या परीक्षा केंद्रावर जेव्हा एसटीएफने छापा टाकला, तेव्हा पोलीसही चक्रावून गेले. तिथल्या यूपीएस रूममध्ये जमिनीच्या खाली २४ बाय २४ इंचाचे एक गुप्त  चेंबर बनवण्यात आले होते. या चेंबरमध्ये दोन लॅपटॉप आणि राउटर लपवून ठेवले होते, जे ऍक्टिव्ह मोडमध्ये होते. या उपकरणांच्या सहाय्याने बाहेरील व्यक्ती उमेदवारांचे कॉम्प्युटर रिमोट ॲक्सेसद्वारे हाताळून पेपर सोडवत होत्या.

एका उमेदवाराकडून १० लाखांची मागणी

तपासात उघड झाले की, ही टोळी प्रत्येक उमेदवाराकडून परीक्षा पास करून देण्यासाठी १० लाख रुपयांची मागणी करत असे. स्क्रीनवर असे भासत असे की उमेदवार स्वतः परीक्षा देत आहे, पण प्रत्यक्षात पेपर दुसऱ्याच ठिकाणाहून तज्ज्ञांद्वारे सोडवला जात होता. आयपी एड्रेस बायपास करून ही सर्व यंत्रणा अत्यंत गोपनीय पद्धतीने चालवली जात होती.

उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड एसटीएफची संयुक्त कारवाई

उत्तर प्रदेश एसटीएफकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, उत्तराखंड एसटीएफचे महानिरीक्षक डॉ. निलेश आनंद भरणे आणि एसएसपी नवनीत सिंह भुल्लर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. १३ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रत्यक्ष परीक्षेवेळी घातलेल्या या छाप्यात तांत्रिक आणि फॉरेन्सिक पुराव्यांसह संपूर्ण सिस्टीम सील करण्यात आली आहे.

कायदेशीर कलमान्वये गुन्हे दाखल

अटक करण्यात आलेल्या आरोपींवर उत्तराखंड स्पर्धा परीक्षा कायदा २०२३ च्या कलम ११ आणि १२ सह भारतीय न्याय संहिता आणि आयटी कायद्याच्या विविध कलमान्वये कोतवाली देहारादून येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास आता अतिरिक्त पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत केला जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे देशातील अशा प्रकारचा हा बहुधा पहिलाच गुन्हा आहे, जिथे जमिनीखाली भुयार बनवून पूर्ण परीक्षा केंद्र हॅक करण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांनी घटनास्थळावरून लॅपटॉप, राउटर, कनेक्टर आणि इथरनेट केबल्सचे जाळे जप्त केले आहे. गैरप्रकार उघड झाल्यानंतर संबंधित परीक्षा केंद्र सील करण्यात आले आहे.

Web Title : देश का सबसे बड़ा हाई-टेक परीक्षा घोटाला उजागर: रिमोट से पेपर हल!

Web Summary : देहरादून में एक हाई-टेक गिरोह का पर्दाफाश हुआ, जो उम्मीदवारों के लिए रिमोट से परीक्षा हल करने के लिए भूमिगत कक्ष का उपयोग कर रहा था। पुलिस ने घोटाले में शामिल दो लोगों को गिरफ्तार किया, जो प्रति उम्मीदवार ₹10 लाख की मांग कर रहे थे। परीक्षा केंद्र सील कर दिया गया है।

Web Title : Massive Exam Scam Busted: Underground Chamber Used for Remote Cheating

Web Summary : A high-tech cheating ring was exposed in Dehradun, using an underground chamber with laptops to remotely solve exams for candidates. Police arrested two individuals involved in the scam, which demanded ₹10 lakh per candidate. The exam center has been sealed.