लष्करी जवानाकडे हेरॉईन सापडले; श्रीनगरहून पंजाबला करत होता तस्करी, अटकेमुळे खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 12:33 IST2025-05-15T12:33:21+5:302025-05-15T12:33:51+5:30
सैन्याचा जवान तस्करीत असल्याने आता पंजाब पोलिसांचे बडे अधिकारी देखील सतर्क झाले असून आरोपीने आतापर्यंत कितीवेळा श्रीनगरहून पंजाबमध्ये ड्रग्जची तस्करी केली याचा तपास केला जात आहे.

लष्करी जवानाकडे हेरॉईन सापडले; श्रीनगरहून पंजाबला करत होता तस्करी, अटकेमुळे खळबळ
भारतीय सैन्यात श्रीनगरमध्ये एलओसीवर तैनात असलेल्या जवानाकडे हेरॉईन सापडल्याने खळबळ उडाली आहे. लुधियानाचा रहिवासी असलेल्या विक्रमजीत सिंग याला लुधियाना पोलिसांनी २५५ ग्रॅम हेरॉईनसह अटक केली आहे. ड्रग्ज तस्करीमध्ये सैन्यातील जवानाचा हात असल्याने पोलीस यंत्रणेसह सैन्य दलातही खळबळ उडाली आहे.
विक्रमजीतने श्रीनगरहून हेरॉईनची तस्करी करून ते पंजाबमध्ये विकण्यासाठी आणले होते. सैन्याचा जवान तस्करीत असल्याने आता पंजाब पोलिसांचे बडे अधिकारी देखील सतर्क झाले असून आरोपीने आतापर्यंत कितीवेळा श्रीनगरहून पंजाबमध्ये ड्रग्जची तस्करी केली याचा तपास केला जात आहे.
वरिष्ठ पोलिस अधीक्षक अंकुर गुप्ता यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन याची माहिती दिली आहे. आरोपीला कोठडीत घेऊन त्याची कसून चौकशी केली जात आहे. अनेक महत्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे, असे त्यांनी सांगितले.
विक्रमजीत सिंग हा १० मे रोजी रजेवर गावी आला होता. जोधनच्या मुख्य बाजारात जोधन पोलिस स्टेशनचे प्रभारी साहिबमीत सिंग आणि उपनिरीक्षक गुरचरण सिंग संशयास्पद वाटणाऱ्या लोकांची तपासणी करत होते. तेव्हा विक्रमजीतची तपासणी केली असता त्याच्याकडे २५५ ग्रॅम हेरॉईन सापडले. विक्रमजीतच्या पॅन्टच्या उजव्या खिशात एक लिफाफा होता, त्यात हे हेरॉईन होते. त्याने आपण सैन्यात असल्याचे पोलिसांना सांगितले. त्याची गाडीही जप्त करण्यात आली आहे. याचबरोबर मोबाईल जप्त करून तपासासाठी सायबर सेलची मदत घेण्यात येत आहे.
भारत-पाक सीमेवर तणाव असताना एकीकडे सुट्टीवर आलेल्या सैनिकांना सीमेवर बोलावण्यात आलेले असताना विक्रमजीत सिंग याला सैन्यातून सुट्टी कशी मिळाली, असा सवालही उपस्थित होत आहे. भारतीय सैन्यालाही याची माहिती देण्यात आली आहे.