देशभरात पावसाचे थैमान, हिमाचलमध्ये ढगफुटीनंतर १४ जणांचा मृत्यू, ३१ जणांचा शोध सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 08:51 IST2025-07-04T08:51:03+5:302025-07-04T08:51:24+5:30
भूस्खलनामुळे केदारनाथ यात्रा स्थगित; ९ जुलैपर्यंत महाराष्ट्रात मुसळधार

देशभरात पावसाचे थैमान, हिमाचलमध्ये ढगफुटीनंतर १४ जणांचा मृत्यू, ३१ जणांचा शोध सुरूच
नवी दिल्ली / अजमेर : देशभरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने अनेक राज्यांत जनजीवन विस्कळीत झाले असून, उत्तराखंडमध्ये सोनप्रयागमध्ये भूस्खलनामुळे केदारनाथ यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. ४०हून अधिक यात्रेकरूंना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. राजस्थानात अजमेर दर्गा शरीफच्या परिसरात एक जुने दगडी छत व भिंत कोसळली.
दरम्यान, हिमाचल प्रदेशात ढगफुटीनंतर आलेल्या पुरात वाहून गेलेल्यांतील मृतांची संख्या १४ झाली असून, ३१ जणांचा शोध सुरू आहे.
राजस्थानात धो-धो
राज्यात गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या संततधारेमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक भागांत अतिवृष्टी झाली असून, चित्तोडगड जिल्ह्यात बस्सीमध्ये तब्बल ३२० मिमी पावसाची नोंद झाली. अजमेर दरगाह शरीफच्या एका जुन्या बांधकामाचे छत व भिंत कोसळली असून, सुदैवाने यात कुणालाही इजा झाली नाही.
कुठे-कुठे आहे अलर्ट
देशभर मान्सून सक्रिय झाला असून, हवामान विभागानुसार दि. ९ जुलैपर्यंत अनेक राज्यांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पश्चिम भारत : महाराष्ट्र, गोवा, गुजरात, कोकण आणि सौराष्ट्रात दि. ९ जुलैपर्यंत मुसळधार पाऊस.
दक्षिण भारत : येत्या सात दिवसांत कर्नाटक, आंध्र किनारपट्टी, तामिळनाडू, तेलंगणा, केरळ, लक्षद्वीपमध्ये अनेक भागांत मुसळधार पाऊस पडेल.
ईशान्य भारत : अरुणाचल, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम येथे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल.