२१ राज्यांत मुसळधारेचा इशारा; दिल्ली तुंबली, केरळमध्ये दाणादाण, कर्नाटकात रेड अलर्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 11:16 IST2025-05-27T11:16:50+5:302025-05-27T11:16:59+5:30
९ राज्यांत मान्सूनची धमाकेदार एन्ट्री

२१ राज्यांत मुसळधारेचा इशारा; दिल्ली तुंबली, केरळमध्ये दाणादाण, कर्नाटकात रेड अलर्ट
नवी दिल्ली : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या प्रभावाने देशभर पाऊस पडत असून दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहारसह दक्षिणकडे केरळपर्यंत सर्वत्र पावसाचा जोर आहे. दिल्लीत मुसळधार पावसाने रस्ते तुंबले असून उत्तरेकडील अनेक राज्यांत पाऊस सुरू झाला आहे. सोमवारी ९ राज्यांत मान्सूनने धमाकेदार एन्ट्री केली आहे.
देशभर मान्सूनची वाटचाल सुरू असून २१ राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. २४ मे रोजी दक्षिण भारतात मान्सून दाखल झाल्यानंतर २५ मेपर्यंत तो गोवा, मिझोराम, मणिपूर, नागालँडसह महाराष्ट्रातही पोहोचला आहे.
मंगळवारी केरळ, कर्नाटक, गोवा, कोकण, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा या भागांत दमदार पाऊस पडेल. या भागात भूस्खलन व सखल भागांसाठी इशारा देण्यात आला आहे.
१० मजली इमारतीएवढी लाट आली, सौरव गांगुलीचा भाऊ-वहिनी बचावले
पुरी : येथील समुद्रात स्पीड बोट उलटून झालेल्या अपघातातून क्रिकेटपटू सौरव गांगुली याचा भाऊ स्नेहाशीष गांगुली व त्याची पत्नी अर्पिता हे थोडक्यात बचावले. शनिवारी सायंकाळी हा अपघात झाला. ही स्पीड बोट एका उंच लाटेला धडकली आणि उलटली. सुमारे १० मजली इमारतीएवढी ही लाट होती, असे अर्पिताने सांगितले. या बोटीमध्ये कमी प्रवासी होते आणि समुद्र खळवळलेला होता. त्यामुळे लाटेला धडकताच बोट उलटून प्रवासी पाण्यात फेकले गेल्याचे तिने सांगितले. अर्पिता या अपघातानंतर प्रचंड धास्तावली आहेत.
देशात कुठे काय घडले?
दक्षिण बंगालमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला असून २८ मेपासून राज्याचा अनेक भाग मुसळधार पावसाने व्यापेल.
दिल्लीत अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतुकीचा खोळंबा.
कर्नाटकच्या सीमा भागांत सोमवारी सलग तिसऱ्या दिवशी प्रचंड पाऊस. या सर्व भागांत पाच दिवसांसाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे. दक्षिण कन्नड जिल्ह्यात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत.
केरळच्या उत्तरेकडील भागांत मुसळधार पावसामुळे प्रचंड नुकसान झाले असून अनेक लोक विस्थापित झाले आहेत. त्यांच्यासाठी मदत छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. उत्तर प्रदेशात २७ जिल्ह्यांत वेगवान वाऱ्यासह अनेक भागाला पावसाने झोडपले.
सौदीत तापमान ५१.६ अंशावर
संयुक्त अरब अमिरातीने सलग दुसऱ्या दिवशी तापमानाचा विक्रम मोडला. येथील तापमान ५१.६ अंश सेल्सिअसवर पोहोचले. जे देशातील आतापर्यंतच्या सर्वाधिक तापमानाच्या म्हणजेच ५२ अंश सेल्सिअसजवळ पोहोचले आहे. येथील लोक उष्णतेने होरपळत आहेत.