भेटायला म्हणून गेला अन् भलताच अडकला! गावकऱ्यांनी २ मुलांच्या आईसोबत लावून दिलं तरुणाचं लग्न अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 18:36 IST2025-11-25T18:36:30+5:302025-11-25T18:36:49+5:30
ही महिला दोन मुलांची आई आहे आणि आता तिने आपल्या दुसऱ्या पतीसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे.

AI Generated Image
बिहारच्या मुजफ्फरपूर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे गावकऱ्यांनी सामाजिक न्याय करण्याचा एक अजब मार्ग निवडला. एका विवाहित महिला आणि तिच्या कथित प्रियकराला एकत्र पकडून त्यांचं थेट मंदिरात जबरदस्तीने लग्न लावून दिलं. विशेष म्हणजे ही महिला दोन मुलांची आई आहे आणि आता तिने आपल्या दुसऱ्या पतीसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. कांटी पोलीस स्टेशन परिसरात घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे.
लपून-छापून भेटत होते, गावकऱ्यांनी रंगेहात पकडलं!
मिळालेल्या माहितीनुसार, कांटी परिसरातील सुरुची कुमारी नावाच्या विवाहित महिलेची ओळख दीपक चौरसिया नावाच्या युवकाशी झाली. हे दोघे अनेक दिवसांपासून एकमेकांना लपून-छापून भेटत होते. गावकऱ्यांच्या नजरेतून त्यांचा हा व्यवहार सुटला नाही.
सोमवारी जेव्हा हे प्रेमी जोडपे पुन्हा एकत्र दिसले, तेव्हा गावकऱ्यांनी त्यांना रंगेहात पकडले. संतप्त गावकऱ्यांनी कोणतेही कायदेशीर पाऊल उचलण्याऐवजी, थेट पंचायत भरवली आणि दोघांना थेट गावातील मंदिरात नेले. गावकऱ्यांनी पुजाऱ्याला बोलावून सर्वांच्या उपस्थितीत दोघांना सात फेरे घ्यायला लावले.
या अनोख्या लग्नाची सर्वात खास बाब म्हणजे, दीपक चौरसिया हा परगावातील असल्याने त्याच्या बाजूने कोणीही नव्हतं. त्यामुळे गावकरीच वधू आणि वर पक्षाचे वऱ्हाडी बनले. सर्व गावकऱ्यांनी मिळून लग्नाच्या सर्व विधी पार पाडल्या.
नोकरीच्या निमित्ताने भेटायचो, प्रेम नव्हतं!
जबरदस्तीने लग्न झालेल्या दीपक चौरसियाने माध्यमांना सांगितले की, "आमच्यात कोणतेही प्रेमसंबंध नव्हते. आम्ही फक्त भेटायचो. पण गावकऱ्यांनी दबाव टाकल्यामुळे आणि त्यांच्या सांगण्यावरून दोघांच्याही परस्पर सहमतीने आम्हाला लग्न करावे लागले."
दुसरीकडे, दोन मुलांची आई असलेल्या सुरुची कुमारीने स्पष्ट केले आहे की, तिने आपल्या मर्जीने दीपकसोबत लग्न केले आहे आणि आता ती पहिल्या पतीकडे परत न जाता दीपकसोबतच राहणार आहे. गावकऱ्यांनी घेतलेल्या या 'सामाजिक पंचायती'वर आणि जबरदस्तीने लावून दिलेल्या या लग्नावर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. प्रेम, समाज आणि लग्न या तिहेरी चक्रात अडकलेले हे प्रकरण सध्या मुजफ्फरपूरमध्ये चर्चेचा विषय बनले आहे.