शेती आणि दागिने विकले, 45 लाख खर्च करून गेला अमेरिकेत, येताना हातात बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 09:05 IST2025-02-17T09:02:38+5:302025-02-17T09:05:16+5:30
Deport indian from usa: अमेरिकेत अवैधपणे घुसखोरी करणाऱ्या तरुणांच्या कहाण्या आता समोर येऊ लागल्या आहेत.

शेती आणि दागिने विकले, 45 लाख खर्च करून गेला अमेरिकेत, येताना हातात बेड्या
Indian deported from us: अमेरिकेत जाण्यासाठी घरच्यांनी शेती विकली, नातेवाईकांकडून उधार पैसे घेतले आणि त्याला अमेरिकेला पाठवले. तो अमेरिकेच्या सीमेवर पोहोचला आणि जवानांनी अवैधपणे घुसखोरी करताना त्याला पकडलं. अमेरिकेत जाण्यासाठी केलेला ४५-४६ खर्च पाण्यात गेला. ही गोष्ट एका तरुणांची ज्याला अवैध घुसखोर म्हणून पकडल्यानंतर शनिवारी (१५ फेब्रुवारी) ११६ भारतीयांसोबत भारतात परत पाठवण्यात आलं.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
लाखो रुपये खर्च करून अवैध मार्गाने अमेरिकेत जाणाऱ्या भारतीयांची घरवापसी सुरू झाली आहे. शनिवारी ११६ भारतीयांना घेऊन अमेरिकेचे लष्करी विमान भारतातील अमृतसर येथील विमानतळावर उतरले. यात पंजाबमधील ६५, हरयाणातील ३३, गुजरातमधील ८, उत्तर प्रदेश, गोवा, महाराष्ट्र आणि राजस्थानातील प्रत्येकी दोन व्यक्तींचा समावेश होता. तर हिमाचल प्रदेश आणि जम्म-काश्मीरमधील प्रत्येकी एक जण होता.
अमेरिकेपर्यंत पोहोचला, सीमा पार करताना पकडले
रविवारी (१६ फेब्रुवारी) पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यात असलेल्या चांदीवाला गावात एक २० वर्षीय तरुण पोहोचला. डंकी मार्गे अमेरिकेच्या सीमेपर्यंत तो पोहोचला. पण, सीमेवरच त्याला घुसखोरी करताना पकडण्यात आले.
अमेरिकेने परत पाठवलेल्या ११६ जणांमध्ये २० वर्षीय सौरवही होता. सौरवने सांगितले की, तो २७ जानेवारी रोजी सीमा पार करून अमेरिकेत घुसण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी त्याला अधिकाऱ्यांनी पकडले. सौरव १७ डिसेंबर २०२४ रोजी डंकी मार्गे अमेरिकेला जाण्यासाठी घरातून निघाला होता.
'आम्हाला १८ दिवस एका छावणीमध्ये ठेवण्यात आले होते. आमचे मोबईल काढून घेण्यात आले. परवा आम्हाला सांगण्यात आले की, दुसऱ्या छावणीमध्ये घेऊन जाण्यात येत आहे. जेव्हा आम्हाला विमानात बसवण्यात आले, तेव्हा त्यांनी सांगितले की, आम्हाला भारतात नेण्यात येत आहे', असे सौरव याने सांगितले.
दोन एक शेत विकले, नातेवाईकांकडून पैसे उसने घेतले
सौरवने सांगितले की, 'माझ्या कुटुंबाने मला परदेशात पाठवण्यासाठी ४५-४६ लाख रुपये खर्च केला. दोन एकर शेती विकली आणि नातेवाईकांकडूनही उसने पैसे घेतले. आम्हाला अॅमस्टरडम, पनामा आणि मेक्सिकोमार्गे अमेरिकेच्या सीमेपर्यंत नेण्यात आले. अमृतसरला येताना आमच्या हातात बेड्या आणि पायात साखळदंड घालण्यात आले होते', असे सौरवने सांगितले.