प्रेमात वेडा होऊन पाकिस्तानात पोहोचला! तुरुंगवास भोगून आता अलीगडचा 'बादल बाबू' पुन्हा भारतात येणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 08:47 IST2025-12-28T08:46:38+5:302025-12-28T08:47:29+5:30
एका पाकिस्तानी तरुणीच्या प्रेमासाठी सर्व कायदे-नियम तोडून सीमा ओलांडणारा उत्तर प्रदेशचा बादल बाबू अखेर आता भारतात परतणार आहे.

प्रेमात वेडा होऊन पाकिस्तानात पोहोचला! तुरुंगवास भोगून आता अलीगडचा 'बादल बाबू' पुन्हा भारतात येणार!
एका पाकिस्तानी तरुणीच्या प्रेमासाठी सर्व कायदे-नियम धाब्यावर बसवून सीमा ओलांडणारा उत्तर प्रदेशचा बादल बाबू अखेर आता भारतात परतणार आहे. पाकिस्तानातील तुरुंगात शिक्षेचा कालावधी पूर्ण केल्यानंतर त्याची सुटका झाली असून, सध्या त्याला डिटेंशन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. एका आठवड्यात बादल आपल्या मायदेशी, म्हणजेच अलीगडमधील आपल्या गावी परतण्याची दाट शक्यता आहे.
नेमकं प्रकरण काय?
अलीगड जिल्ह्यातील बरला क्षेत्रातील खिटकारी गावाचा रहिवासी असलेला बादल बाबू फेसबुकच्या माध्यमातून पाकिस्तानच्या एका २१ वर्षीय तरुणीच्या प्रेमात पडला होता. या प्रेमापोटी त्याने कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय, बेकायदेशीरपणे भारत-पाकिस्तान सीमा ओलांडली होती. २७ डिसेंबर २०२४ रोजी पाकिस्तान पोलिसांनी त्याला अटक केली. व्हिसा किंवा इतर कागदपत्रे नसल्यामुळे त्याला थेट तुरुंगाची हवा खावी लागली.
पाकिस्तानी वकिलाची माणुसकी
बादलचे वडील कृपाल सिंह यांनी आपल्या मुलाच्या सुटकेसाठी दिल्लीतील एका मित्राच्या मदतीने कराचीतील प्रख्यात वकील फियाज रामे यांच्याशी संपर्क साधला. विशेष म्हणजे, माणुसकीच्या नात्याने फियाज रामे यांनी हे केस मोफत लढले. बादल हा कोणताही हेर किंवा गुप्तहेर नसून केवळ भावनिक कारणांमुळे पाकिस्तानात आला आहे, हे त्यांनी न्यायालयात सिद्ध केले. ३० एप्रिल रोजी न्यायालयाने त्याला एक वर्षाची शिक्षा आणि ५००० रुपयांचा दंड ठोठावला होता. मात्र, वकिलांच्या प्रयत्नांमुळे त्याची शिक्षेपूर्वीच सुटका झाली आहे.
ज्या प्रेमासाठी गेला, तिनेच फिरवली पाठ!
ज्या मुलीसाठी बादलने आपला जीव धोक्यात घातला, तिनेच त्याला मोठा झटका दिला. बादल जेव्हा पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील त्या मुलीच्या गावी पोहोचला, तेव्हा तिने स्पष्टपणे सांगितले की, तिला बादलशी लग्न करण्यात कोणताही रस नाही. इतकेच नाही तर, एका जुन्या व्हिडिओमध्ये बादलने आपण तिथे धर्मपरिवर्तन केल्याचेही म्हटले होते, मात्र वडिलांच्या मते हे विधान त्याने दबावाखाली केले असावे.
गावात आनंदाचे वातावरण
बादलच्या घरवापसीची बातमी समजताच खिटकारी गावात आनंदाला उधाण आले आहे. दोन दिवसांपूर्वीच वडिलांना स्वप्नात मुलगा दिसला होता आणि आता त्याच्या सुटकेची बातमी मिळाली आहे. आई-वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू असून, त्यांनी केंद्र सरकारला मुलाची लवकरात लवकर सुरक्षित रवानगी करण्यासाठी विनंती केली आहे. भारत सरकारने प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू केली असून, आता सर्वांच्या नजरा बादलच्या परतीच्या प्रवासाकडे लागल्या आहेत.