भररस्त्यात केस ओढले, गळा कापला, मग पत्नीच्या अंगावर घातली कार, लोक काढत राहिले व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 19:24 IST2026-03-26T19:24:45+5:302026-03-26T19:24:59+5:30
Karnataka Crime News: एका पतीने पत्नीला बेदम मारहाण करून, तिचा गळा कापून नंतर तिच्या अंगावर कार घालत तिला जिवे मारल्याची धक्कादायक घटना कर्नाटकमधील कलबुर्गी येथे घडली आहे.

भररस्त्यात केस ओढले, गळा कापला, मग पत्नीच्या अंगावर घातली कार, लोक काढत राहिले व्हिडीओ
एका पतीने पत्नीला बेदम मारहाण करून, तिचा गळा कापून नंतर तिच्या अंगावर कार घालत तिला जिवे मारल्याची धक्कादायक घटना कर्नाटकमधील कलबुर्गी येथे घडली आहे. येथील अफजलपूर तालुक्यातील बल्लुरगी गावात अक्षय नावाच्या एका तरुणाने भररस्त्यात क्रूर पद्धतीने पत्नीची हत्या केली आहे. सान्वी असं या मृत तरुणीचं नाव असून, ती महाराष्ट्रातील रहिवासी होती.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आरोपी पती अक्षय हा पत्नी सान्वी हिला कारमधून घटनास्थळी घेऊन आला. त्यानंतर त्याने तिला कारमधून ओढून बाहेर काढले. त्यानंतर भररस्त्यात तिच्या गळ्यावर वार केले तसेच तिला कारखाली चिरडण्याचा प्रयत्न केला. यात गंभीर जखमी झालेल्या सान्वी हिचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार एवढा वेगाने घडला की, आजूबाजूच्या लोकांना काही कळलंही नाही.
मात्र या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे घटनास्थळावर उपस्थित असलेल्या लोकांनी आरोपी त्याच्या पत्नीवर हल्ला करत असताना कुणीही तिला मदत करण्याचाही प्रयत्न केला नाही. उलट तिथे उपस्थित असलेल्यांनी मोबाईलवर या घटनेचा व्हिडीओ चित्रित केला.