"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 20:43 IST2025-12-11T20:42:30+5:302025-12-11T20:43:25+5:30
"...हे राहुल गांधी यांना लवकर समजेल अशी मी आशा करते."

"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
नवी दिल्ली : देशात संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. मात्र, चर्चा सुरू आहे ती राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्याची. त्यांच्या परदेश दौऱ्यांवरून पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. यावेळी दिल्ली स्टेट हज कमिटीच्या अध्यक्षा कौसर जहां यांनी राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्यांवर प्रश्न उपस्थित करत थेट निशाणा साधला आहे.
कौसर जहां यांनी राहुल गांधी यांना 'पार्ट-टाइम पॉलिटिशियन' म्हणून संबोधले आहे. त्या म्हणाल्या, "ते विरोधी पक्षनेते आहेत, पण त्यांचा जनतेच्या प्रश्नांशी काहीही संबंध नाही. ते आधी प्रश्न विचारतात आणि सरकार उत्तर देते, तेव्हा सभागृह सोडून पळून जातात. ते सध्या SIR च्या मुद्द्यावरून जनतेची दिशाभूल करत आहेत. काल अमित शाह घुसखोरीच्या मुद्द्यावर बोलत असताना त्यांनी संसदेतून कशा पद्धतीने पळ काढला, हे आपण बघितले. आता घुसखोरांशी यांचे असे काय नाते आहे, हे मला समजत नाही." एवढेच नाही तर, "यांच्या याच भूमिकेमुळे जनतेनेही यांना गांभीर्याने घेणे सोडले आहे. याच कारणामुळे ते एकापाठोपाठ एक निवडणुका हरत आहेत आणि पराभवानंतर वारंवार ईव्हीएमचे कारण सांगतात," असेही त्या म्हणाल्या.
पीएम मोदींच्या कामावर जनतेचा विश्वास
कौसर जहां पुढे म्हणाल्या, "हे लोक वारंवार एसआयआरचे कारण सांगतात. पीएम मोदी यांच्या नेतृत्वाखालील जनकल्याणकारी कामांमुळे जनता भाजपवर विश्वास दाखवत आहे. दुर्दैवाने राहुल गांधी आणि त्यांच्या पक्षाला याचा अनुमानच नाही. असे त्या म्हणाल्या. दरम्यान त्यांनी, अमित शाह बोलत असताना राहुल गांधी यांनी त्यांचे बोलणे नियंत्रित करण्याचा प्रयत्न केल्याच्या मुद्द्याचाही त्यांनी उल्लेख केला.
राहुल गांधी यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद -
राहुल गांधी यांना गोपनीय परदेश दौऱ्या करण्याचा मोठा छंद आहे आणि मलावाटचे की, यामुळे काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते स्वतःच त्रस्त असावेत, असेही त्या म्हणाल्या. भारताच्या राजकारणात आता पार्टटाईम पॉलिटिशियन चालणार नाही. येथे कर्मयोगी मोदी आहेत. त्यांनी गेल्या १२ वर्षांत एकही सुट्टी न घेता जनतेची सेवा केली आहे आणि लोक आपल्या कर्मयोग्याला मनापासून पसंत करतात. मोदी जींनी जनतेचे मन जिंकले आहेत. हे राहुल गांधी यांना लवकर समजेल अशी मी आशा करते.