“कविता करना बंद किया क्या?”; PM मोदींनी केली आठवलेंना विचारणा, तत्काळ पूर्ण केली इच्छा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 13:18 IST2025-08-11T13:16:51+5:302025-08-11T13:18:06+5:30
Ramdas Athawale Fulfill PM Modi Desire Instantly: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इच्छा व्यक्त करताच रामदास आठवले यांनी तत्काळ एक नवीन कोरी कविता करून दाखवली.

“कविता करना बंद किया क्या?”; PM मोदींनी केली आठवलेंना विचारणा, तत्काळ पूर्ण केली इच्छा
Ramdas Athawale Fulfill PM Modi Desire Instantly: गेल्या काही दिवसांपासून राज्यासह राष्ट्रीय पातळीवरील राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. एकीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मतचोरीच्या आरोपांकडून निवडणूक आयोगावर मोठे आरोप केले आहेत. तर शरद पवार यांनीही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन माणसे भेटून काही ऑफर दिल्याचा खळबळजनक दावा केला आहे. यावरून आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे सुरू आहेत. यातच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
रामदास आठवले हे महाराष्ट्रातील भाजपावर नाराज असल्याचे म्हटले जात आहे. पंतप्रधान मोदी यांच्याशी झालेल्या भेटीबाबत रामदास आठवले यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदींशी सुमारे १० मिनिटे बोललो. मी त्यांच्यासमोर महाराष्ट्रातील परिस्थितीबद्दल माझे म्हणणे मांडले. परंतु, या भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामदास आठवले यांना कवितांबाबत विचारणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इच्छा व्यक्त करताच रामदास आठवले यांनी तत्काळ एक नवीन कोरी कविता करून दाखवली.
कविता करना बंद किया क्या?
बोधगयाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रामदास आठवले दीर्घ काळानंतर आमने-सामने आले. आठवले यांनी मोदींना नमस्कार केल्यावर मोदींचे लक्ष आठवलेंच्या वाढलेल्या पोटाकडे गेले. 'आप का वजन काफी बढ़ गया है', अशा शब्दांत मोदींनी आठवले यांना अप्रत्यक्षपणे वजन नियंत्रणात ठेवण्याचा आदेशच दिला. त्यानंतर मोदींनी आठवले यांना 'बहोत दिन हो गए आप की नई कविता नही सुनी', असे हसत हसत म्हणाले. 'कविता करना छोड तो नही दिया?' असा प्रश्न करायलाही ते विसरले नाहीत. यामुळे आठवले मनोमन सुखावले. त्यांना दोन ओळी सुचल्या... 'दिल्ली में मेरा बढ गया वजन, हर कोई करता है मेरी कविता पसंद...'
दरम्यान, आरपीआयला महाराष्ट्रात कोणतेही मंत्रिपद मिळाले नाही किंवा सत्तेत विशेष भूमिका मिळाली नाही. महाराष्ट्रात आम्हाला मंत्रीपद मिळायला हवे होते, परंतु राज्यातील भाजप युनिटने आम्हाला दिले नाही. यामुळे आमच्या समाजात नाराजी आहे. मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी या विषयावर आधीच चर्चा केली आहे. आता आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका आणि नगरपालिका यासारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आमच्या पक्षाला जागा मिळाव्या, अशी मागणी रामदास आठवले केली.