हाथरस येथील चेंगराचेंगरीतील मृतांचा आकडा वाढला, रुग्णालयात मृतदेह ठेवण्यासाठीही उरली नाही जागा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2024 18:59 IST2024-07-02T18:58:42+5:302024-07-02T18:59:18+5:30
Hathras stampede: उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे एका सत्संगामध्ये चेंगराचेंगरी होऊन भीषण दुर्घटना घडली आहे. या चेंगराचेंगरीमध्ये आतापर्यंत ८६ हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र मृतांचा आकडा १०० हून अधिक झाल्याचा दावा काही माध्यमांकडून करण्यात येत आहे.

हाथरस येथील चेंगराचेंगरीतील मृतांचा आकडा वाढला, रुग्णालयात मृतदेह ठेवण्यासाठीही उरली नाही जागा
उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे एका सत्संगामध्ये चेंगराचेंगरी होऊन भीषण दुर्घटना घडली आहे. या चेंगराचेंगरीमध्ये आतापर्यंत ८६ हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र मृतांचा आकडा १०० हून अधिक झाल्याचा दावा काही माध्यमांकडून करण्यात येत आहे. चेंगराचेंगरीची भीषणता विचारात घेता मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस आणि प्रशासनाकडून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. तसेच घटनास्थळावर प्रशासकीय अधिकारी दाखल झाले आहेत.
हाथरस येथील फुलरई मुगलगढी येथे या सत्संगाचं आयोजन करण्यात आलं होतं. सरकार नारायण विश्व हरी भोले बाबा यांचा हा सत्संह होता. बाबांचं प्रवचन संपल्यानंतर चरणस्पर्श करून आशीर्वाद घेण्यासाठी झुंबड उडाली आणि त्यातून ही चेंगराचेंगरी झाली, असे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, हाथरस येथे झालेल्या दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दु:ख व्यक्त केले असून, घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचून मदत कार्याला वेग आणण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. तसेच जखमींवर योग्य उपचार करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले आहेत.
तसेच मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २ लाख आणि जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, कार्यक्रमाच्या आयोजकांविरोधाक एफआयआर दाखल करून कारवाई करण्याची तयारी शासनाकडून करण्यात येत आहे.
तसेच या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. एडीजी आग्रा विभाग यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेली समिती या दुर्घटनेची चौकशी करणार आहे. तसेच अलिगडच्या कमिश्नरांनाही या दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.