Pranjal Dahiya : Video - "ओ काका, मी तुमच्या मुलीच्या वयाची..."; गैरवर्तनावर भडकली प्रसिद्ध गायिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 15:35 IST2025-12-30T15:34:24+5:302025-12-30T15:35:24+5:30
Pranjal Dahiya : प्रसिद्ध गायिका आणि डान्सर प्रांजल दहिया एका लाईव्ह इव्हेंट दरम्यान अचानक तिचा परफॉर्मन्स थांबवताना दिसते. व्हिडिओमध्ये ती प्रेक्षकांकडे इशारा करत काही लोकांच्या गैरवर्तनाबद्दल त्यांना सुनावताना दिसत आहे.

Pranjal Dahiya : Video - "ओ काका, मी तुमच्या मुलीच्या वयाची..."; गैरवर्तनावर भडकली प्रसिद्ध गायिका
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये प्रसिद्ध गायिका आणि डान्सर प्रांजल दहिया एका लाईव्ह इव्हेंट दरम्यान अचानक तिचा परफॉर्मन्स थांबवताना दिसते. व्हिडिओमध्ये ती प्रेक्षकांकडे इशारा करत काही लोकांच्या गैरवर्तनाबद्दल त्यांना सुनावताना दिसत आहे. विशेषतः एका वयोवृद्ध व्यक्तीच्या कृत्यामुळे ती इतकी संतापली की, तिने मंचावरूनच त्याला सज्जड दम दिला.
व्हिडिओमध्ये प्रांजल स्पष्ट शब्दांत म्हणते, “ओ काका, मी तुमच्या मुलीच्या वयाची आहे, स्वतःवर कंट्रोल ठेवा.” तिचं हे वाक्य ऐकताच तिथे उपस्थित असलेल्या इतर प्रेक्षकांमध्ये शांतता पसरली. यानंतर तिने सर्व प्रेक्षकांना सभ्यपणे वागण्याचं आवाहन केलं, जेणेकरून कोणत्याही कलाकाराला चुकीचं वाटणार नाही.
ही क्लिप सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाली असून बहुतांश युजर्सनी प्रांजल दहियाच्या धाडसाचं भरभरून कौतुक केलं आहे. महिला कलाकाराने अशा प्रकारे मंचावरून आवाज उठवणं अत्यंत गरजेचं होतं असं लोकांचं म्हणणं आहे. अनेक युजर्सनी या घटनेला महिलांच्या सुरक्षिततेशी संबंधित महत्त्वाचा मुद्दा मानलं आहे.
कमेंट सेक्शनमध्ये एका युजरने लिहिले की, "प्रांजलने जे केले ते अगदी योग्य होते, प्रत्येक कलाकाराला सन्मान मिळायला हवा." दुसऱ्या एका युजरने म्हटलं की, "कलाकार स्टेजवर आपली कला सादर करण्यासाठी येतात, कोणाच्या वाईट नजरेचा सामना करण्यासाठी नाही." याच दरम्यान अनेकांनी ही घटना समाजातील मानसिकतेत बदल घडवून आणण्याच्या गरजेशी जोडली आहे.