हरियाणात दगाफटका टाळण्यासाठी काँग्रेसची जोरदार रणनीती, या तीन नेत्यांवर सोपवली मोठी जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2024 15:32 IST2024-09-14T15:31:24+5:302024-09-14T15:32:25+5:30
Haryana Assembly Election 2024: हरियाणा विधानसभेची निवडणूक आता अवघ्या काही दिवसांवर आली आहे. तसेच या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, राज्यात प्रचाराची जोरदार रणधुमाळी सुरू आहे.

हरियाणात दगाफटका टाळण्यासाठी काँग्रेसची जोरदार रणनीती, या तीन नेत्यांवर सोपवली मोठी जबाबदारी
हरियाणा विधानसभेची निवडणूक आता अवघ्या काही दिवसांवर आली आहे. तसेच या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, राज्यात प्रचाराची जोरदार रणधुमाळी सुरू आहे. दरम्यान, हरियाणातील सध्याच्या राजकीय परिस्थितीत काँग्रेसला सत्तेची चाहूल लागली असून, कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवण्यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी कंबर कसली आहे. त्यासाठीच काँग्रेसकडून तीन नेत्यांवर महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या अध्यक्षांनी तीन नेत्यांना पर्यवेक्षक म्हणून नियुक्त केलं आहे. या तीन नेत्यांमध्ये अशोक गहलोत, अजय माकन आणि प्रताप सिंह बाजवा यांचा समावेश आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसचा प्रचार आणि कामगिरीवर या नेत्यांचं लक्ष असणार आहे.
काही दिवसांपूर्वी काँग्रेसने हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली होती. या यादीमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, प्रियंका गांधी, सोनिया गांधी यांच्यासह हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू, माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा यांच्यासह ४० नेत्यांच्या नावांचा समावेश होता.