जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 11:24 IST2025-11-09T11:22:13+5:302025-11-09T11:24:42+5:30
गंभीर गुन्ह्यांमध्ये तुरुंगात असलेल्या कैद्यांकडे मोबाईल असल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत.

जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
Bengaluru Jail VIP Treatment: कर्नाटकची राजधानी बंगळूरु येथील परप्पना अग्रहारा मध्यवर्ती कारागृह पुन्हा एकदा एका धक्कादायक कारणामुळे चर्चेत आले आहे. तुरुंगाच्या आतून लीक झालेल्या व्हिडिओमुळे कैद्यांना मिळत असलेल्या व्हीआपी ट्रीटमेंटचा मोठा पर्दाफाश झाला आहे. हे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, यामध्ये मोठे गुन्हेगार मोबाइल फोन वापरताना आणि टीव्ही पाहताना स्पष्टपणे दिसत आहेत.
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, या व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या कैद्यांमध्ये आयएसआयएस रिक्रूटर जुहैब हमीद शकील मन्ना याचाही समावेश आहे. व्हिडिओमध्ये मन्ना फोनवर स्क्रोल करताना, कोणाशी तरी बोलताना आणि चहा पिताना दिसत आहे, तर बॅकग्राउंडमध्ये टीव्ही किंवा रेडिओ सुरु आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेनुसार, जुहैब मन्ना याने 'कुरान सर्कल ग्रुप'च्या माध्यमातून मुस्लिम तरुणांचे कट्टरपंथीकरण केले, त्यांची भरती केली आणि त्यांना अवैधरित्या तुर्कीमार्गे सीरियाला आयएसआयएसमध्ये सामील होण्यासाठी पाठवले होते.
एका दुसऱ्या व्हिडीओमध्ये, कुख्यात सीरियल रेपिस्ट उमेश रेड्डी तुरुंगात मोबाइलचा वापर करताना दिसला आहे. रेड्डीला १९९६ ते २०२२ दरम्यान २० महिलांवर बलात्कार आणि त्यापैकी १८ महिलांची हत्या केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले आहे. सुप्रीम कोर्टाने त्याला ३० वर्षांची कठोर शिक्षा सुनावली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, त्याच्या बॅरेकमध्ये टीव्ही आणि दोन अँड्रॉइड फोन तसेच एकजण कीपॅड फोन वापरताना तो दिसला आहे. अभिनेत्री रान्या रावच्या गोल्ड स्मगलिंग केसमध्ये अटक झालेला तरुण राजू हा देखील या व्हिडीओमध्ये दिसत आहे. तो तुरुंगात फोन वापरताना आणि स्वतःच्या सेलमध्ये स्वयंपाक करताना दिसतोय. जिनिव्हाला पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्याला अटक करण्यात आली होती.
हे सर्व व्हिडिओ कथितरित्या २०२३ ते २०२५ दरम्यानचे आहेत. अहवालांनुसार, जेल अधिकारी या सर्व गैरप्रकारांची जाण असूनही शांत आहेत. यापूर्वीही, अभिनेता दर्शनला रेणुकास्वामी हत्या प्रकरणात शाही मेहमाननवाजी मिळाल्याबद्दल सुप्रीम कोर्टाने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तरीही तुरुंगात व्हिआयपी ट्रीटमेंट सुरूच आहे इतकेच नव्हे, तर नुकतेच तुरुंगात वार्डन कल्लप्पा याला गांजा पुरवण्याचा प्रयत्न करताना पकडण्यात आले आहे. तसेच, अलीकडील छाप्यांमध्ये कैद्यांकडून मोबाइल फोन, इंडक्शन स्टोव्ह, चाकू आणि रोख रक्कम यासारखे सामान जप्त करण्यात आले आहे. यामध्ये जेल कर्मचारी, अधिकाऱ्यांची मिलीभगत असल्याचा पोलिसांचा आरोप आहे.
मुख्यमंत्री आणि गृहमंत्री काय म्हणाले?
या व्हिडिओ क्लिप्स व्हायरल झाल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तुरुंग विभागानेही या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. दुसरीकडे, गृहमंत्री परमेश्वर यांना याबद्दल विचारले असता, त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता निघून गेले.