Hanuman Marriage: बाल ब्रह्मचारी हनुमान विवाहित? 'या' राज्यात पत्नीसह विराजमान आहेत बजरंगबली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2023 17:35 IST2023-05-18T17:34:59+5:302023-05-18T17:35:48+5:30
Hanuman Marriage: ब्रह्मचारी हनुमान विवाहित कसे? विवाहित असून ब्रह्मचारी का म्हणतात? जाणून घ्या कथा...

Hanuman Marriage: बाल ब्रह्मचारी हनुमान विवाहित? 'या' राज्यात पत्नीसह विराजमान आहेत बजरंगबली...
Hanuman Ji Marriage: प्रभु श्रीरामाचे निस्सीम भक्त असलेल्या हनुमानाला आपण सर्वात शक्तिशाली देवता मानतो. असे मानले जाते की, बजरंगबली चिरंजीवी आहेत. जो भक्त त्यांची मनोभावे भक्ती करतो, हनुमान नेहमी त्याच्या पाठिशी असतात. हनुमानाने आपले संपूर्ण आयुष्य श्रीरामाच्या भक्तीमध्ये समर्पित केले आहे. आपण सर्व हनुमानाला बालब्रह्मचारी मानतो, पण काही धर्मग्रंथानुसार हनुमानाचा विवाह झाला आहे.
भारतात असे एक मंदिर आहे, जिथे महाबली हनुमान त्यांच्या पत्नीसह विराजमान आहेत. भक्त त्यांची सपत्नीक पूजा करतात. पण, हनुमानाचे लग्न कधी आणि कोणाशी झाले, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. लग्न झाले तर मग हनुमानाला ब्रह्मचारी का म्हटले जाते? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया.
हनुमानाच्या विवाहाची कथा पराशर संहितेत आढळते. पराशर संहितेनुसार, हनुमानाने सूर्यदेवाला आपले गुरू म्हणून स्वीकारले होते. सूर्यदेवाला 9 विद्या आत्मसात होत्या. हा विद्या हनुमानालाही शिकायच्या होत्या. हनुमानाने पाच विद्या शिकल्या, मात्र इतर चार विद्यांचे ज्ञान देण्यासाठी सूर्यदेवासमोर संकट उभे ठाकले. कारण, या विद्या शिकण्यासाठी हनुमानाला लग्न करणे अनिवार्य होते.
हनुमानाची पत्नी कोण आहे?
यामुळे सूर्यदेवाने हनुमानाला लग्न करण्याचा सल्ला दिला. हनुमानाने पूर्ण शिक्षण घेण्याचे व्रत केले होते, म्हणून बजरंगबली लग्नाला तयार झाले. पण, हनुमानाची वधू कोण होणार, याचा विचार प्रत्येकजण करू लागला. याचा उपाय म्हणून सूर्यदेवाने त्यांची कन्या सुर्वाचला हिच्याशी हनुमानाचे लग्न लावण्याचा विचार केला. अशा रितीने हनुमानाने सुर्वाचला हिच्याशी लग्न केले आणि राहिलेल्या सर्व विद्या शिकल्या.
लग्नानंतरही हनुमानाला ब्रह्मचारी का म्हटले जाते?
लग्नापूर्वी सूर्यदेवाने हनुमानाला सांगितले होते की, लग्नानंतरही ते बाल ब्रह्मचारीच राहतील. कारण त्यांची कन्या सुर्वाचला लग्नानंतरही तपश्चर्येमध्ये मग्न राहील. परम तपस्वी असल्याने सुर्वाचला तपश्चर्येत तल्लीन झाली. अशा प्रकारे हनुमानाचे लग्न झाले, पण ते कायम ब्रह्मचारीच राहिले.
या राज्यात हनुमानाचे मंदिर
तेलंगणातील खम्मम जिल्ह्यात हनुमानाचे एक मंदिर आहे, जिथे हनुमान पत्नी सुर्वाचलासोबत विराजमान आङेत. असे मानले जाते की, येथे दर्शन केल्याने वैवाहिक जीवनातील सर्व समस्या दूर होतात.
डिस्क्लेमर: वरील माहिती सार्वजनिक माहितीच्या आधारे देण्यात आली आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाहीत.