विरोधी पक्षांमधील प्रमुख नेत्यांच्या फोनमध्ये हॅकिंग? Apple च्या अलर्टवर सरकारनं दिलं असं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2023 14:21 IST2023-10-31T14:21:37+5:302023-10-31T14:21:54+5:30
Opposition Leaders Phone Hacking : तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यासह विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीतील अनेक प्रमुख नेत्यांनी त्यांचे फोन हॅक करण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप केला आहे.

विरोधी पक्षांमधील प्रमुख नेत्यांच्या फोनमध्ये हॅकिंग? Apple च्या अलर्टवर सरकारनं दिलं असं उत्तर
तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यासह विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीतील अनेक प्रमुख नेत्यांनी त्यांचे फोन हॅक करण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. फोन हॅकिंग झाल्याचा आरोप करणाऱ्या नेत्यांमध्ये महुआ मोईत्रांसोबत काँग्रेसचे खासदार शशी थरूर, ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी, काँग्रेसचे प्रवक्ते पवर खेरा यांच्यासह अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांचा समावेश आहे. या नेत्यांनी अॅपलकडून मिळालेल्या अलर्टच्या आधारावर सरकार त्यांचे फोन आणि ईमेल हॅक करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. मात्र सरकारी सूत्रांनी सांगितले की, अॅपलचा अल्गोरिदम बिघडल्यामुळे हे अलर्ट आले आहेत. सरकार याबाबत सविस्तर स्पष्टीकरण लवकरच देणार आहे.
महुआ मोईत्रा यांनी केलेल्या ट्विटनंतर विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या फोनमध्ये हॅकिंग झाल्याच्या आरोपांना सुरुवात झाली होती. महुआ मोईत्रा यांच्यानंतर काँग्रेस खासदार शशी थरूर, पवन खेडा आणि शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनीही आपल्यालाही असा अलर्ट आल्याचा दावा केला. आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्डा, सपा अध्यक्ष अखिलेश यादव, सीपीएमचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांच्या फोनवरही अशा प्रकारचा अलर्ट आल्याचा आरोप महुआ मोईत्रा यांनी केला आहे.
महुआ यांनी सांगितले की, मला Apple कडून अलर्ट आणि ईमेल मिळाला की सरकार माझा फोन आणि ईमेल हॅक करण्याचा प्रयत्न करत आहे. गृहमंत्रालयाला टॅग करत महुआ यांनी पुढे लिहिलं आहे की, ‘’अदानी आणि पीएमओचे लोक, जे मला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहेत, तुमच्या भीतीमुळे मला तुमची दया येते. शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी, मला आणि इंडिया आघाडीच्या इतर तीन नेत्यांना आतापर्यंत असे अलर्ट मिळाले आहेत’’.