राजीनामा देऊन काँग्रेसच्या 5 आमदारांचा भाजपात प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2020 20:31 IST2020-06-27T20:29:30+5:302020-06-27T20:31:43+5:30
राज्यसभेच्या निवडणुकांपूर्वी काँग्रेसच्या 8 आमदारांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला असून त्यापैकी 5 आमदारांनी आज भाजपात प्रवेश केला आहे.

राजीनामा देऊन काँग्रेसच्या 5 आमदारांचा भाजपात प्रवेश
गांधीनगर -गुजरातमधील काँग्रेसच्या 5 आमदारांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर आज भाजपात प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष जीतू वाघाणी यांनी या पाचही माजी आमदारांचे स्वागत करत भाजपाच्या कमळ चिन्हाचा गमछा त्यांच्या गळ्यात अडकवला. या पाचही माजी आमदारांना भाजपाकडून पोटनिवडणुकीचे तिकीट देण्यात येणार असल्याची माहिती आहे.
राज्यसभेच्या निवडणुकांपूर्वी काँग्रेसच्या 8 आमदारांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला असून त्यापैकी 5 आमदारांनी आज भाजपात प्रवेश केला आहे. लिंबडीचे माजी आमदार सोमाभाई कोली पटेल, अबडासा येथील प्रद्युम्न सिंह जडेजा, गढडाचे प्रवीण मारू, धारीचे जेवी काकडिया आणि डांगचे माजी आमदार मंगल गामित यांनी 15 मार्च 2020 रोजी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर काँग्रेसने आपल्या पक्षाचे सर्वच आमदार जयपूर येथील एका रिसॉर्टवर पाठवले होते. दरम्यान, जून महिन्यातील पहिल्याच आठवड्यात कपराडा येथील आमदार जितू चौधरी, मोरबीचे आमदार ब्रजेश मेरजा आणि करजणचे अक्षय पटेल यांनीही राजीनामा दिला आहे. त्यामुळे, राज्यसभा निवडणुकांमध्ये भाजपाने आपली तिसरी जागा सहजच विजयी केली.
પ્રદેશ કાર્યાલય ‘શ્રી કમલમ’ ખાતે પ્રદેશ અધ્યક્ષ શ્રી @jitu_vaghani એ પૂર્વ ધારાસભ્યશ્રીઓ શ્રી બ્રિજેશભાઈ મેરજા, શ્રી જે.વી.કાકડિયા, શ્રી અક્ષયભાઈ પટેલ, શ્રી પ્રદ્યુમનસિંહ જાડેજા અને શ્રી જીતુભાઇ ચૌધરીને વિધિવત રીતે ખેસ પહેરાવી ભારતીય જનતા પાર્ટીમાં સ્વાગત કર્યું. pic.twitter.com/s14kErqWtr
— BJP Gujarat (@BJP4Gujarat) June 27, 2020
भाजपा अध्यक्षा जीतूभाई वाघाणी यांनी या 5 आमदारांचे भाजपात स्वागत करत, काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेस पक्षातील गटबाजीमुळे आमदार पक्ष सोडत आहेत. काँग्रेसमध्ये आमदारांचे कुणीही ऐकून घेत नाही, दिल्लीतील नेता राज्यातील प्रदेशाध्यक्षांना निर्देश देत आहेत, असे वाघाणी यांनी म्हटले. तसेच, सप्टेंबर महिन्यांपूर्वी रिक्त जागेवर पोटनिवडणूक होणे आवश्यक आहे, असेही वाघाणी म्हणाले.