कौतुकास्पद! आईची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुलाने 290 शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे कर्ज फेडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 16:25 IST2025-10-30T16:24:21+5:302025-10-30T16:25:10+5:30
सर्व शेतकरी कर्जमुक्त; गावामध्ये आनंदाची वातावरण!

कौतुकास्पद! आईची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुलाने 290 शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे कर्ज फेडले
अमरेली (गुजरात)- आपल्या आईसाठी आणि तिच्यावरील प्रेमासाठी मुले काहीही करायला तयार होतात. याचीच प्रचिती गुजरातच्या अमरेली जिल्ह्यातून आली आहे. सूरतमधील उद्योगपती बाबुभाई जिरावाला यांनी आपल्या आईच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने स्वतःच्या गावातील 290 शेतकऱ्यांचे सुमारे 90 लाख रुपयांचे कर्ज स्वतःच्या खर्चाने फेडले. त्यांच्या या उपक्रमाने संपूर्ण गाव कर्जमुक्त झाले असून, गावात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
शंभर वर्षे जुन्या सहकारी संस्थेचा वाद मिटवला
अमरेली जिल्ह्यातील सावरकुंडला तालुक्यातील जीरा गावात शंभर वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या सेवा सहकारी संस्थेवर 1990च्या दशकात घोटाळ्याचे आरोप झाले होते. या घोटाळ्यामुळे शेतकऱ्यांच्या नावावर चुकीने कर्ज नोंदवले गेले आणि त्यामुळेच गावातील शेतकरी बँक कर्जापासून वंचित राहिले. प्रकरण न्यायालयात गेले आणि अनेक वर्षं प्रलंबित राहिले.
आईची इच्छा पूर्ण केली
रिअल इस्टेट व्यावसायिक बाबुभाई जिरावाला यांनी सांगितले की, “आईची इच्छा होती की, तिचे दागिने विकून गावासाठी काही चांगले काम करावे. त्यामुळेच मी गावकऱ्यांचे कर्ज फेडायचे ठरवले. गावच्या 290 शेतकऱ्यांचे कर्ज फेडून आम्ही आईची इच्छा पूर्ण केली. आज आम्ही अत्यंत समाधानी आणि आनंदी आहोत.”
शेतकऱ्यांना मिळाले ‘नो लोन सर्टिफिकेट’
बाबुभाई आणि त्यांच्या भावांनी भावनगर बँकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून 90 लाख रुपयांचे कर्ज चुकवले. बँकेनेही त्यांच्या या समाजहिताच्या निर्णयाचे स्वागत केले. संपूर्ण रक्कम भरल्यानंतर बँकेकडून सर्व शेतकऱ्यांना ‘नो कर्ज प्रमाणपत्र’ देण्यात आले. एका छोट्या समारंभात ही प्रमाणपत्रे वाटण्यात आली आणि गावकऱ्यांनी बाबुभाईंचे आभार मानले. गावातील शेतकऱ्यांनी या कृतीचे मनापासून स्वागत केले. अनेकांनी म्हटले की, “आमच्या गावातील मुलाने केवळ कर्ज फेडले नाही, तर आमचा आत्मसन्मानही परत मिळवून दिला.”