Gujarat News: उद्या, म्हणजेच २७ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी आहे, देशभरात उत्साहाचे वातावरण पाहायल मिळत आहे. लाडक्या गणरायाचे स्वागत करण्यासाठी सर्व गणेशभक्त सज्ज आहेत. पण, गुजरातमधील बडोदा शहरात या पवित्र सणाला गालबोट लावण्याचा प्रयत्न झाला आहे. येथील पाणीगेट परिसरात काल (२५ ऑगस्ट) रात्री ३ वाजता निर्मल पार्क युथ क्लबने स्थापन केलेल्या गणपतीच्या मूर्तीवर समाजकंटकांनी अंडी फेकल्याची घटना घडली आहे.
दैनिक भास्करच्या वृत्तानुसार, या धक्कादायक घटनेमुळे शहरातील वातावरण ढवळून निघाले आहे. विश्व हिंदू परिषदेचे वडोदरा महानगर सचिव विष्णू प्रजापती यांनी सांगितले की, पोलिसांच्या उपस्थितीत ही अंडी फेकल्याची घटना घडली आहे. विहिंपने याप्रकरणी आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. शहर पोलिस ठाण्याचे पीआय राजेंद्र चौहान यांनी सांगितले की, सध्या चौकशी सुरू असून, चार संशयितांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांवरही अंडी फेकलीगणपती मंडळातील सदस्य सत्यम यांनी सांगितले की, आम्ही गणपतीची मूर्ती घेऊन जात असताना तिसऱ्या मजल्यावरुन कुणीतरी अंडी फेकली. आम्ही ताबडतोब शहर पोलिसांना कळवले. पोलिस घटनास्थळी पोहोचताच त्यांच्यावरही अंडी फेकण्यात आली. ही घटना रात्री किशनवाडी कृष्णा तलावातून पाणीगेटला जाताना शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मजार मार्केटमध्ये घडली. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. मात्र, पोलिसांनी सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
पोलिसांनी कठोर शिक्षा करावी विश्व हिंदू परिषदेचे वडोदरा महानगर सचिव विष्णू प्रजापती म्हणाले की, पोलिसांच्या उपस्थितीत आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी अंडी फेकण्यात आली आहेत. हा एका मोठ्या कटाचा भाग आहे. या कटात जो कोणी सहभागी असेल, त्याची चौकशी झाली पाहिजे आणि पोलिसांनी कायदेशीर कारवाई करावी. या समाजकंटकांना उदाहरण देण्यासाठी आरोपींना मोठी शिक्षा द्यावी, अन्यथा या गोष्टी अशाच सुरू राहतील, अशी मागणी विहिंपने केली आहे.