हृदयद्रावक! कोणी भाऊ गमावला तर कोणी आई-बाबा; घरातून 8 जण निघाले पण 'ती' एकटीच परतली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2022 16:06 IST2022-11-01T15:52:46+5:302022-11-01T16:06:33+5:30
Morbi Bridge Collapse : पूल दुर्घटनेत कोणी आपला मुलगा गमावला, कोणी भाऊ, तर कोणी आई-बाबा... अनेकांच्या डोळ्यादेखत त्यांचं कुटुंब क्षणात उद्ध्वस्त झालं आहे.

फोटो - आजतक
गुजरातमधील मोरबी येथे मच्छू नदीवरील पूल कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. दुर्घटनेत १४१ हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर १७७ जणांना वाचवण्यात आले असून जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पुलावरील ५०० हून अधिक जण नदीच्या पात्रात पडले होते. या दुर्घटनेत कोणी आपला मुलगा गमावला, कोणी भाऊ, तर कोणी आई-बाबा... अनेकांच्या डोळ्यादेखत त्यांचं कुटुंब क्षणात उद्ध्वस्त झालं आहे.
एका लहान मुलाचा बूट हा नदी किनारी पडलेला सापडला तर गर्भवती महिलेचा मृतदेह पाहून देखील अनेकांच्या अंगावर काटा आला. अशीच एक मन सुन्न करणारी घटना आता समोर आली आहे. जमीला या महिलेने देखील या पूल दुर्घटनेत आपली जवळची माणसं गमावली आहेत. जमीला आपल्या कुटुंबातील आठ जणांसोबत पूल पाहण्यासाठी गेली होती. पण पूल कोसळला आणि सर्वच संपलं. तिच्या कुटुंबातील सात जण तिने गमावली असून ती एकटीच वाचली आहे.
जमीलाने दिलेल्या माहितीनुसार, "माझी नणंद दिवाळीच्या सुट्टीसाठी येथे आली होती. नणंद आणि तिची दोन मुलं. तसेच माझे पती आणि मुलांसह बाहेर गेली होती. माझे पती आम्हाला पूल पाहायला घेऊन गेले होते. पण या दुर्घटनेत मी सात जण गमावले आणि एकटीच परत आली आहे." अशीच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मोरबी येथे राहणारे हार्दिक फलदू हे आपली पत्नी आणि चार वर्षांचा मुलगा जियांश याला घेऊन पूल पाहण्यासाठी गेले होते.
पूल कोसळल्याने हार्दिक आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला तर जियांशला वाचवण्यात यश आलं. पण आता त्याच्या डोक्यावरचं आईवडिलांचं छत्र मात्र कायमचं गेलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. भाजपा खासदाराच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबातील 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मोहन कुंदारिया हे भाजपाचे राजकोटमधील खासदार आहेत. कुंदारिया यांच्या नातेवाईकांचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. कुंदरिया यांच्या 12 नातेवाईकांना या दुर्घटनेत जीव गमवावा लागला असून यामध्ये बहिणीच्या सासरच्या मंडळींचा समावेश आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"