गुजरातमध्ये मोदींचं निर्विवाद वर्चस्व कायम

By वैभव देसाई | Published: December 15, 2017 08:42 AM2017-12-15T08:42:02+5:302017-12-15T18:27:32+5:30

गेल्या काही दिवसांपासून गुजरात निवडणुकीचा रणसंग्राम शिगेला पोहोचला आहे. निवडणुकीत काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल गांधी खुद्द गुजरातमध्ये ठाण मांडून होते.

In Gujarat, Modi's unquestioned dominance continued | गुजरातमध्ये मोदींचं निर्विवाद वर्चस्व कायम

गुजरातमध्ये मोदींचं निर्विवाद वर्चस्व कायम

Next
ठळक मुद्देपाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल यानं मोदींच्या विरोधात जोरदार रणशिंग फुंकून राहुल गांधींसोबत हातमिळवणी केली. मोदींचा पाडाव करण्यासाठी काँग्रेसनं यंदा जातीय समीकरणांवरही लक्ष्य केंद्रित केलंय.

गेल्या काही दिवसांपासून गुजरात निवडणुकीचा रणसंग्राम शिगेला पोहोचला आहे. निवडणुकीत काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल गांधी खुद्द गुजरातमध्ये ठाण मांडून होते. 22 वर्षांनंतर यंदा गुजरातमध्ये काँग्रेस पुन्हा सत्तेत येणार असे आडाखे बांधले जात होते. परंतु एक्झिट पोलच्या अंदाजानुसार मोदींचा करिष्मा गुजरातेत कायम असून, काँग्रेसचं गुजरातमध्ये सत्ता हस्तगत करण्याचं स्वप्न अपुरं राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल यानं मोदींच्या विरोधात जोरदार रणशिंग फुंकून राहुल गांधींसोबत हातमिळवणी केली. 

मोदींचा पाडाव करण्यासाठी काँग्रेसनं यंदा जातीय समीकरणांवरही लक्ष्य केंद्रित केलंय. त्याच पार्श्वभूमीवर ओबीसी नेते अल्पेश ठाकोर व दलित नेते जिग्नेश मेवाणी यांना वळचणीला घेऊन काँग्रेसनं मोदींपुढे आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधी जोरदार सभांचा धडाका लावत होते आणि त्या प्रचारसभांनाही अनपेक्षित प्रतिसाद लाभला होता. हार्दिक, अल्पेश ठाकोर आणि जिग्नेश मेवाणीला काँग्रेसनं जवळ केल्यानं भाजपासह मोदींची धाकधुकी काहीशी वाढली होती. त्यात भरीस भर म्हणून हार्दिकचे सिडी प्रकरणही बाहेर आले. त्याचा भाजपाला कमी पण हार्दिक पटेललाच जास्त फायदा झाल्याचं पाहायला मिळालं. असो. तरीही एक्झिट पोलमधून गुजराती जनतेनं भाजपावरील विश्वास कायम ठेवला आहे, असं म्हटल्यास वावगं ठरू नये. 

काँग्रेस पक्ष गुजरातमध्ये 1995मध्ये सत्तेत होता, तर केंद्रात काँग्रेसची 2014पर्यंत सत्ता होती. त्यामुळे साहजिकच गुजरातची निवडणूक राहुल गांधी व काँग्रेस पक्षासाठी महत्त्वाची तर आहेच, परंतु एवढ्या प्रदीर्घ काळात भाजपानं गुजराती जनतेसाठी काय केले, या प्रश्नाचं उत्तरही देणारी ठरणार आहे. गुजरातच्या लोकांचे प्रश्न आणि गुजरातवासीयांना आज ग्रासणाऱ्या समस्यांचं प्रतिबिंब या निवडणुकीतून नक्कीच उमटणार आहे. वाढते पेट्रोलचे दर, नोटाबंदी आणि जीएसटी सारख्या करप्रणालीमुळे गुजरातमधील व्यापा-यांना उद्भवलेल्या अडचणी या नजरेआड करण्यासारख्याही नाहीत. राहुल गांधींनी त्या नाराज व्यापा-यांची गुजरातमध्ये भेट घेऊन त्यांना आपल्या बाजूनं वळवण्याचा केलेला पुरेपूर प्रयत्न हेसुद्धा लक्षात घेण्यासारखे आहे. 

2014च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींनी देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन तीनशेहून अधिक सभा घेण्याचा सपाटा लावला होता. त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग हे पाहुण्यासारखेच काँग्रेसच्या सभांना उपस्थिती दर्शवत होते. विशेष म्हणजे भाजपाचे फायरब्रँड नेते अटलबिहारी वाजपेयीसुद्धा एखाद्या राज्यातील निवडणुकीसाठी स्वतःला झोकून देऊन प्रचार करताना कधी पाहायला मिळाले नव्हते. परंतु नरेंद्र मोदी तसे करत असत. ते छोटछोट्या निवडणुकीत सगळी ताकद पणाला लावून प्रचार करतात. त्यामुळे पंतप्रधानपदाची गरिमा खालावत असल्याचीही अनेकांकडून टीका केली जाते. मात्र रणांगणात स्वतः उतरून जो लढतो तोच खर लढवय्या असतो. 

चार वर्षांपूर्वीसुद्धा मोदींच्या याच दमदार भाषणांनी त्यांनी अख्खा देश काबिज केला होता. नरेंद्र मोदी हे पक्षहित व स्वहितापेक्षा देशहिताला जास्त महत्त्व देतात, याचा विश्वास पटल्यामुळेच जनतेनं मोदींना भरभरून मतांनी निवडून दिलं. गुजरात निवडणुकीचा निकाल काहीही लागला तरी मोदींनी सद्यस्थितीत जनतेच्या विश्वासाला दिलेला तडा ही दुर्लक्षित करण्यासारखी गोष्ट नाही. मणिशंकर अय्यर यांनी मोदी यांना ‘नीच’ संबोधणे हेसुद्धा राजकीय सभ्यतेला अशोभनीयच आहे. काँग्रेसने त्याची लागलीच दखल घेत मणिशंकर अय्यर यांच्यावर कारवाई करत त्यांना बडतर्फही केले. परंतु मोदी जे काही बोलतात, तसेच त्यांचे वाचाळवीर मंत्री ज्या पद्धतीनं काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर टीका करतात, त्याबद्दल कारवाई तर लांबच मोदींना साधा खेदही व्यक्त करावासा वाटत नाही. गुजरात निवडणुकीत पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केल्याचा आरोप हे सगळे पाहिले तर मोदी यांच्या बोलण्यावरचा लोकांचा विश्वास उडायला लागलाय, असं बोलल्यास चुकीचं ठरू नये. 

गुजरातेत गेली 22 वर्षे भाजपाची सत्ता असतानाही मोदींनी या निवडणुकीत राहुल गांधींचा धर्म, पाकिस्तान व हिंदू-मुसलमान मतांचं धुव्रीकरण करण्याच्या मुद्द्यांना महत्त्व दिले. विकासाच्या बाता मारणारे मोदीही गुजरात निवडणुकीत जातीय समीकरणं आणि काँग्रेसवर टीका करण्यातच धन्यता मानत होते. मोदींच्या जातीयवादी विधानांमुळे गुजरातमधील जनतेतंही काहीसं भीतीचं वातावरण आहे. काँग्रेस म्हणजे मुस्लिमधार्जिणा पक्ष असल्याची प्रतिमा निर्माण करण्याचा मोदी प्रयत्न करत होते. परंतु याचा सुशिक्षित तरुण पिढीवर काय परिणाम होईल, याचा थोडासा विचारही मोदींनी केलेला नसावा. त्यामुळे मोदींनी जातीयवादी समीकरणं सोडून खरोखर विकासाच्या संकल्पना राबवाव्यात, जेणेकरून जनतेत असलेली त्यांची विकास पुरुषाची प्रतिमा कायम राहील, हीच आशा आहे.

Web Title: In Gujarat, Modi's unquestioned dominance continued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.