हायकोर्टाच्या सुनावणीदरम्यान जेष्ठ वकील पित होते बिअर; Video Viral होताच न्यायमूर्तींनी केली कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 17:06 IST2025-07-02T16:55:43+5:302025-07-02T17:06:50+5:30
गुजरात हायकोर्टाच्या सुनावणीदरम्यान एक जेष्ठ वकील बिअर पीत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

हायकोर्टाच्या सुनावणीदरम्यान जेष्ठ वकील पित होते बिअर; Video Viral होताच न्यायमूर्तींनी केली कारवाई
Gujarat High Court: कोर्टाने खटल्यांचे लवकर निवारण व्हावं आणि न्यायालयीन कामात त्रास कमी व्हावा यासाठी ऑनलईन सुनावणीची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र लोक या प्रक्रियेचा वाट्टेल तसा वापर करत आहेत. ऑनलाईन सुनावणीच्या प्रक्रियेचा लोक चुकीचा फायदा घेत आहेत. दोन दिवसांपूर्वी गुजरात हायकोर्टातील ऑनलाईन सुनावणीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता ज्यामुळे एक व्यक्ती चक्क कमोडवर बसून सुनावणीसाठी हजर झाला होता. या सगळ्या प्रकाराने न्यायालयाची प्रतिष्ठाच दुखावली गेली होती. त्यानंतर आता गुजरात हायकोर्टाच्याच आणखी एका सुनावणीचा व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यामध्ये एक जेष्ठ वकील सुनावणी सुरु असताना बिअर पिताना दिसत आहेत.
गुजरात हायकोर्टात एका प्रकरणाच्या व्हर्च्युअल सुनावणीदरम्यान एका ज्येष्ठ वकिल न्यायाधीशांसमोर बिअर पित असल्याचे समोर आलं आले. ज्यामुळे न्यायाधीश संतापले आणि त्यांनी वकिलाविरुद्ध स्वतःहून दखल घेण्याचा निर्णय घेतला. या खटल्याच्या ऑनलाइन सुनावणीला जेष्ठ वकिल बिअर पिऊन मोबाईलवर बोलत असल्याचे दिसून आले. न्यायालयाला त्यांचे कृत्य आवडले नाही. न्यायालयाने या वकिलाविरुद्ध अवमान केल्याची कारवाई सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
गुजरात हायकोर्टात २६ जून रोजी न्यायमूर्ती संदीप भट्ट यांच्या खंडपीठासमोर एका खटल्याची सुनावणी सुरू होती. या दरम्यान ज्येष्ठ वकील भास्कर तन्ना व्हर्च्युअली सामील झाले. कॅमेरा चालू होता आणि सुनावणी सुरू होती. भास्कर तन्ना हे प्रत्यक्ष कोर्टाच्या खोलीत उपस्थित नसल्याने, ते ऑनलाइन हजर आहेत हे विसरले असावे. लाईव्ह सुनावणीदरम्यान, वकील साहेबांनी बिअर पिऊन त्यांची तहान भागवण्यास सुरुवात केली. इतकेच नाही तर बिअर पिताना भास्कर तन्ना हे फोनवरही बोलत होते. त्यांचे हे कृत्य रेकॉर्ड करण्यात आले. त्यांची ही क्लिप सोशल मीडियावरही व्हायरल झाली.
या सगळ्या प्रकारानंतर १ जुलै रोजी न्यायमूर्ती ए.एस. सुपेहिया आणि न्यायमूर्ती आर.टी. वाच्छानी यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली. न्यायमूर्तींनी तन्नांच्या कृतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. कोर्टाने हे कृत्य अपमानजनक आणि घृणास्पद असल्याचे म्हटलं.
Senior advocate Bhaskar Tanna sipping beer during virtual proceedings of the Gujarat High court. pic.twitter.com/ffSmfd6Rhl
— Piyush Rai (@Benarasiyaa) July 1, 2025
"व्हायरल झालेल्या हायकोर्टाच्या कामकाजाच्या व्हिडिओ क्लिपमध्ये सुनावणीला उपस्थित राहताना फोनवर बोलणे आणि बिअरच्या मगमधून मद्यपान करणे हा अपमान आहे. तन्नांचे हे वर्तन न्यायालयाने त्यांना दिलेल्या वरिष्ठ वकिलाच्या विशेषाधिकारांचे उल्लंघन करते. आमच्या मते, त्यांचे पद रद्द केले पाहिजे," असं न्यायमूर्ती ए.एस. सुपेहिया म्हणाले.
दरम्यान, हायकोर्टाने तन्ना यांना नोटीस बजावण्याचे निर्देश दिले. त्यांना खंडपीठासमोर व्हर्च्युअल पद्धतीने हजर राहण्यासही मनाई करण्यात आली आहे. या प्रकरणाची सुनावणी दोन आठवड्यांनी होईल असे कोर्टाने म्हटले.