गुजरातमध्ये पित्याने केली अल्पवयीन मुलाची हत्या; पाण्यातून दिलं विष

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 21:40 IST2025-02-05T21:39:10+5:302025-02-05T21:40:58+5:30

गुजरातमध्ये एका व्यक्तीने मुलाला विष पाजून त्याची हत्या केली आहे.

Gujarat Father killed his minor son by mixing poison in water | गुजरातमध्ये पित्याने केली अल्पवयीन मुलाची हत्या; पाण्यातून दिलं विष

गुजरातमध्ये पित्याने केली अल्पवयीन मुलाची हत्या; पाण्यातून दिलं विष

Gujarat Crime:गुजरातमधील अहमदाबादमध्ये हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुजरातच्या अहमदाबादमध्ये एका व्यक्तीने आपल्या १० वर्षांच्या मुलाला पाण्यात विष मिसळून पाजलं. या घटनेत मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मुलाच्या हत्येनंतर ४७ वर्षीय आरोपीने पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले. आरोपी पित्याने पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केला. मुलाच्या मृत्यूनंतर कुटुंबियांना जबर धक्का बसला आहे.

अहमदाबादमध्ये एका पित्याने आपल्या १० वर्षांच्या मुलाला 'सोडियम नायट्रेट' नावाचे विषारी द्रव्य पाजून त्याची हत्या केली. अहमदाबादच्या बापूनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. कल्पेश गोहेल याने आपल्या मुलाची हत्या केल्यानंतर स्वतः आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता पण त्याने तसे केले नाही. मंगळवारी झालेल्या घटनेनंतर गोहेलला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. हे कृत्य करण्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. आरोपीच्या मुलीने दिलेल्या माहितीनुसार, वडिलांनी उलट्या थांबवण्यासाठी मुलगा ओम आणि १५ वर्षांची जियाला औषध प्यायला दिले होते. यानंतर वडिलांनी सोडियम नायट्रेटयुक्त पाणी ओमला प्यायला दिले.

आरोपीने आपल्या मुलांना विष देऊन आत्महत्या करण्याचा विचार केला होता, परंतु आपल्या मुलाची बिघडलेली प्रकृती पाहून तो घाबरला आणि घरातून पळून गेला. पाणी प्यायल्यानंतर लगेचच मुलाला उलट्या होऊ लागल्या. त्यानंतर कुटुंबियांनी मुलाला एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यानंतर मुलाला मृत घोषित केले. कल्पेश गोहेल हा त्याची दोन मुले, पत्नी आणि आई-वडिलांसह राहत होता. कल्पेश गोहेलने आधी आपल्या दोन मुलांना औषध दिले आणि नंतर पत्नी बाहेर असताना त्याने आपल्या मुलाला विषयुक्त पाणी प्यायला लावले.

या सगळ्या प्रकारानंतर कल्पेशने पोलीस ठाण्यात येऊन आत्मसमर्पण केले. अटकेनंतर आरोपीने आपल्या मुलाला दिलेल्या पाण्यात ३० ग्रॅम सोडियम नायट्रेट मिसळल्याची कबुली दिली. पोलिसांनी सांगितले की, वडिलांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ (१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
 

Web Title: Gujarat Father killed his minor son by mixing poison in water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.