एल्गार परिषद : वरवरा राव नक्षलवाद्यांचे मार्गदर्शक; नक्षली कमांडरचा खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 10:16 AM2018-09-19T10:16:33+5:302018-09-19T10:40:40+5:30

केंद्रीय समितीचे नेते, प्रमुख नेते आणि पत्रकार यासाठी मदत करत असल्याचाही खुलासा

Guidance of Varavara Rao's to Urban Naxalites; Refugee Naxal leader confesses | एल्गार परिषद : वरवरा राव नक्षलवाद्यांचे मार्गदर्शक; नक्षली कमांडरचा खळबळजनक दावा

एल्गार परिषद : वरवरा राव नक्षलवाद्यांचे मार्गदर्शक; नक्षली कमांडरचा खळबळजनक दावा

Next

नवी दिल्ली : नक्षल चळवळीशी संबंध असल्याच्या आरोपावरून काही दिवसांपासून नजरकैदेत असलेले लेखक आणि कवी वरवरा राव यांचे नक्षल चळवळीशी संबंध असल्याचा दावा प्रत्यार्पण केलेल्या नक्षलवाद्यांच्या वरिष्ठ कमांडरने केला आहे. नक्षलवादी वेट्टी रामा याने राव यांचा शहरी नेटवर्क सांभाळण्यामध्ये महत्वाचा सहभाग होता, असे तपास अधिकाऱ्यांना सांगितल्याचे समजते.


टाईम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार, रामा याने दिलेल्या माहितीमध्ये त्याने 2007 ते 18 पर्यंत अनेक लोकांना नक्षल चळवळीमध्ये भरती केले आहे. तसेच कमांडरचे प्रशिक्षणही अनेकांना दिले आहे. नक्षल चळवळीशी जोडला जात असताना मी 16-17 वर्षांचा होतो. 1995 मध्ये नक्षल चळवळीमध्ये सहभागी झालो. त्यानंतर जवळपास 23 वर्षे जंगलात काढल्याचेही म्हटले आहे. 


यावेळी रामा याला शहरी भागातील नक्षलीबाबत विचारले असता त्याने केंद्रीय समितीचे नेते, प्रमुख नेते आणि पत्रकार यासाठी मदत करत असल्याचा खुलासा केला. तसेच वरवरा राव आणि काही पत्रकारांसारख्या लोकांनी पुढे येत शहरी नेटवर्कसाठी मदत केल्याचे सांगितले. 
वरवरा राव यांनी चकमकींमध्ये मारल्या जाणाऱ्या कॉम्रेड यांच्या मृतदेहांना बाहेर काढण्यासाठी मोठी मदत केली. या काळात त्यांनी नक्षलवादी चळवळींना मार्गदर्शनही केले. आम्ही संघटनेच्या मजबुतीसाठी आणि सदस्यांसाठी काम केले. मात्र, वरवरा राव यांची अटक आणि अन्य वरिष्ठ नेत्यांच्या प्रत्यार्पणामुळे संघटना कमकुवत बनत चालली असल्याचेही रामा याने सांगितले.  मात्र, रामा याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येच्या कटाबाबत अधिक माहिती देण्यास नकार दिल्याचे पोलिसांना सांगितले. 


31 डिसेंबर 2017 रोजी शनिवारवाडा येथे झालेल्या एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषणानंतर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा तपास करीत असताना या एल्गार परिषदेला माओवादी संघटनांनी पैसा पुरविल्याचे निष्पन्न झाले होते. त्याअनुषंगाने पुणेपोलिसांनी यापूर्वी नक्षलवाद्यांशी संबंधित असलेल्या 5 जणांना अटक केली होती.  त्यांच्याकडे केलेल्या तपासात व मिळालेल्या ई-मेलमध्ये राजीव गांधी यांच्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या करण्याचा कट रचला जात असल्याची माहिती मिळाली होती. तसेच बंदी असलेल्या माओवादी संघटनांशी या कार्यकर्त्यांचा संबंध असल्याचे निष्पन्न झाल्याने पुणे पोलिसांनी 28 ऑगस्टला कवी वरवरा राव (हैदराबाद), इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकलीचे संपादकीय सल्लागार गौतम नवलाखा (दिल्ली), मानवी हक्क कार्यकर्त्या सुधा भारद्वाज (फरिदाबाद) व व्हर्नोन गोन्साल्विस (मुंबई) अरुण फरेरा (ठाणे) यांना अटक केली होती.

यानंतर देशभरात टीका होऊ लागली होती. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या पाच जणांना नजरकैदेत ठेवण्याचे आदेश दिले होते. 

Web Title: Guidance of Varavara Rao's to Urban Naxalites; Refugee Naxal leader confesses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.