अनोखा आदर्श! स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवा म्हणत तरुणाने परत केला तब्बल 5 लाखांचा हुंडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2021 21:05 IST2021-11-29T21:02:07+5:302021-11-29T21:05:05+5:30
सासरची मंडळी लग्नात देत असलेला 5 लाखांचा हुंडा तरुणाने नाकारल्याची घटना समोर आली आहे.

अनोखा आदर्श! स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवा म्हणत तरुणाने परत केला तब्बल 5 लाखांचा हुंडा
नवी दिल्ली - हुंडा घेणं हा कायद्याने गुन्हा आहे. मात्र आजही अनेक भागात हुंडा घेतला जातो. भेटवस्तूच्या नावाखाली लाखो रुपये, दागिने यांची मागणी हमखास केली जात. मात्र याच दरम्यान आता एक अनुकरणीय घटना समोर आली आहे. एका तरुणाने हुंडा नाकारून अनोखा आदर्श निर्माण केला आहे. सासरची मंडळी लग्नात देत असलेला 5 लाखांचा हुंडा तरुणाने नाकारल्याची घटना समोर आली आहे. स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवा म्हणत तरुणाने महत्त्वाचा निर्णय घेऊन आता लोकांसमोर आदर्श ठेवला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील सीकर जिल्ह्यातील डालमास गावचे रहिवासी असलेल्या महेंद्र सिंह शेखावत यांचा मुलगा देवेंद्र शेखावत याचं लग्न सोनू कंवर नावाच्या तरुणीसोबत झालं. यावेळी लग्नादरम्यानच्या एका कार्यक्रमात सासरच्या मंडळींकडून वराला 5 लाख रुपयांची भेट देण्यात आली. मात्र हुंड्याच्या स्वरुपात देण्यात येणारे हे पैसे घेण्यास नवरदेव देवेंद्रने नकार दिला. नवरदेवाच्या या निर्णयाचं सर्वत्र भरभरून कौतुक केलं जात आहे.
हुंडा ही चुकीची प्रथा
आपला स्वकर्तृत्वावर विश्वास असून स्वतःला विकण्याची इच्छा नसल्याचं देवेंद्रने आपल्या सासरच्या मंडळींना सांगितलं. हुंडा ही चुकीची प्रथा असून जोपर्यंत स्वतःपासून हुंडा नाकारण्याची सुरुवात होत नाही, तोपर्यंत ही प्रथा बंद होणार नाही. त्यामुळे स्वतः पासूनच याची सुरुवात करण्याचा निर्णय़ आपण घेतला आहे. तसेच इतर लोकांना देखील आपण हुंडा नाकारण्यासाठी प्रवृत्त करणार असल्याचं त्यानं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.